नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यामध्ये फारसा फरक नाही. पण गेल्या पाच वर्षात माजी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि वृक्षारोपणाचे नियोजन केले आहे. तेच नियोजन करण्याची गरज सोलापूर विद्यापीठाला पण आहे. त्यामुळे नांदेड विद्यापीठाच्या धर्तीवर सोलापूर विद्यापीठाचे नियोजन करणार आहे, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू तथा नांदेड विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे दि. ६ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये कार्यभार स्वीकारताना आपले मनोगत व्यक्त करत होते.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, प्र. वित्त व लेखाअधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. संतराम मुंडे, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सुरेखा भोसले, डॉ. माधुरी देशपांडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, क्रीडा विभागाचे प्र.संचालक डॉ. मनोज रेड्डी यांची उपस्थिती होती.
डॉ. प्रकाश महानवर हे पॉलिमर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. डॉ. महानवर हे शिक्षण क्षेत्रात २८ वर्षांपासून कार्यरत असून मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील पॉलिमर आणि सरफेस इंजिनिअरिंग या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तिथे ते मानव संसाधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही काम केले आहे. डॉ. महानवर यांनी केमिकल व प्लास्टिक टेक्नॉलॉजीमधून बीएससी आणि एमएस्सी केले असून पॉलिमर क्षेत्रात पीएचडी केली आहे. त्यांच्या नावे पॉलिमर क्षेत्रात संशोधनपर ५ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट्स असून २ पेटंट्ससाठी अर्ज केलेला आहे.
आजपर्यंत त्यांनी ११२ संशोधनपर शोधनिबंध लिहिले असून यातील अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी आजपर्यंत ३२ संशोधनपर प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २१ विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली असून ९ विद्यार्थी पीएचडी करत आहेत. अनेक राष्ट्रीय उद्योगासाठी त्यांनी सल्लागार म्हणूनही कार्य केले आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सदस्य आहेत.
पुढे ते म्हणाले ऑक्सिजन ही मानवाची मूलभूत गरज आहे. पुढील कित्येक दशके ऑक्सिजन पुरेल याची व्यवस्था डॉ. भोसले यांनी करून ठेवलेली आहे. डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाच्या विकासाला जी गती दिली आहे. ती गती कुठेही कमी होणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
अध्यक्षीय समारोपामध्ये माजी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले की, विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे आज हे विद्यापीठ या उंचीवर मी नेऊ शकलो. याचा मला अभिमान आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भविष्यात चांगले नावलौकिक रूपास येईल अशी अशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. उद्धव भोसले हे लवकरच कोल्हापूर येथील संजय घोडावत विद्यापीठामध्ये कुलगुरू म्हणून रुजू होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. यावेळी विद्याशाखेचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, संकुलाचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.