शिंदे सरकार रिक्षावाल्याचे नाही चार्टर्ड विमानवाल्याचे सरकार – अतुल लोंढे
मुंबई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यावर सरकारी तिजोरीतून मोठा खर्च करण्यात आला. रिक्षावाले मुख्यमंत्री अल्पावधीत चार्टर्डवाले झाले आहेत. २०१५ च्या दावोस दौऱ्यावर ६२ लाख २८ हजार रुपये खर्च झाला होता तोच जानेवारी २०२३ च्या दौऱ्यावर ३२ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी असून शिंदे सरकार रिक्षावाल्याचे नाही तर चार्टर्ड विमानवाल्याचे सरकार आहे अशी टीका प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्विस प्लेनचे तिकीट काढून दावोसचा दौरा ठरवला होता का व पंतप्रधानांचा दौरा अचानक ठरला म्हणून ती तिकिटे रद्द करुन चार्टर्ड विमान केले का, असा प्रश्न पडतो. पंतप्रधानांच्या मेट्रो ३ चा उद्घाटनाचा दौरा अचानक ठरला का, आमच्या माहितीप्रमाणे १९ जानेवारीला पंतप्रधान मेट्रो ३ चे उद्घाटन करण्यास आले होते. मग १ कोटी ६० लाख रुपये चार्टर्ड विमानावर खर्च केले, जेवणावळी झाडल्या इतर खर्च १.५ कोटीपेक्षा जास्त केला,जाहिरातीवरही खर्च केला. सगळे खर्च दुप्पट तिप्पट केले. व्यासपीठासाठी १० कोटी खर्च येईल असे सांगून प्रत्यक्षात मात्र १६ कोटी रुपये खर्च केले. ही जनतेच्या पैशाची लुट आहे. शिंदे सरकार सामान्य माणसाचे नाही, विशिष्ट लोकांचे आहे, हे रिक्षाचे नाव सांगतात पण चार्टर्ड सरकार आहे व याचा चालकही चार्टर्ड विमानाचा चालकच आहे.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात औषधे, डॉक्टर व नर्सेस नसल्याने लोक मृत्यू पावले, नवजात शिशू मृत पावले, मख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरापासून याची सुरुवात झाली. नंतर नांदेड, संभाजीनगर व नागपूर मध्ये हे मृत्यूचे लोण पसरले. एका-एका दिवसात एवढे मृत्यू पावतात म्हणजे ‘शासन आपल्या दारी आणि लोकं देवाघरी’ अशा पद्धतीची कार्यशैली असून ही कार्यशैली महाराष्ट्राच्या मुळावर उठली आहे. डॉक्टर व औषधांची कमी नाही असे सरकार धादांड खोटे सांगत आहे. असे असेल तर मग नांदेडमध्ये बाहेरून ६५ नर्सेस का द्याव्या लागल्या? युवक काँग्रेसला औषधे का पुरवावी लागली? हे सगळं सरकारच खोटारडं असून ते आता हे उघडे पडले आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणतात शासकीय रुग्णालयातील मृत्यूची जबाबदारी माझ्या एकट्याची नाही तर संपूर्ण मंत्रिमंळाची आहे. हे सरकार निर्दयी, निर्लज्ज आहे, शेतकरी, सामान्य जनतेच्या जीवाशी यांना काहीही देणेघेणे नाही. एवढे मृत्यू होऊन एक मंत्रीही राजीनामा देण्याची नितिमत्ता दाखवत नाही आणि मंत्री जबाबदारी घेत नाहीत तर जनताही या सरकारची जबाबदारी घेणार नाही, असा टोलाही लोंढे यांनी लगवला आहे.