हिमायतनगर, परमेश्वर काळे| मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु केले असून, त्यांना पाठिंबा म्हणून हिमायतनगर शहरात उपोषण सुरु झाले. या उपोषण स्थळावरून एका मराठा तरूणाने अचानक विहीरीत उडी घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि मराठा कार्यकर्त्यांनी तरुणाला पकडले आहे. माराही आरक्षणासाठी हिमायतनगर येथील मराठा तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलीस व कार्यकर्त्यामुळे फसला असून, त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टाळला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मराठा बांधव आरक्षणासाठी एकजूट झाला असून, नेत्यांना गाव बंदीचे फलक लावण्यात आले आहेत. तर काही गावच्या मराठा समाजातील ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकांनी राजीनामे दिले आहेत. हिमायतनगर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आले असून, आज दुसरा दिवस होता.
या उपोषणाला दि. 29 आक्टोबर रोजी कारला येथील रहिवासी असलेल्या जांबुवंत मिराशे या मराठा तरुणांने उपोषण ठिकाणी भेट दिली. आणि येथिल रजिस्टर मध्ये आपला अभिप्राय लिहून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे मी आत्मदहन करीत असल्याचे नोंद करून उपोषण स्थळावरून पळ काढला. सदरील रजिस्टर बघताच उपस्थित मराठा कार्यकर्ते पोलीस त्या तरुणाच्या मागे सुसाट सुटले. बसस्थानक परिसरात असलेल्या विहीरीत उडी घेण्याचा प्रयत्न मार्था तरुणाने केला असता त्याला पकडले. आणि पोलीसांनी समजूत घालून त्या तरुणांला कुटुंबियांच्या स्वाधीन केले. सदरील घटना टळली असल्याने मराठा समाजातील तरुणांनी असे कुठल्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.