नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा व्याख्याते प्रोफेसर डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांची राजर्षी शाहू शिक्षण परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. डॉ. हनुमंत भोपाळे यांचे साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली.
डॉ. हनुमंत भोपाळे यांचे यशाचा राजमार्ग,ध्येयवेध, समृध्दीच्या वाटा,प्रगतीचे विचारधन, दीपस्तंभ, साफल्य, उत्तम प्रशासक, प्रेरणा, पुन्हा प्रेरणा, परिवर्तन, मनतरंग , साधना शिख गुरू चरित्र आणि कार्य हे ग्रंथ आणि शेकडो लेख प्रकाशित असून, वक्ता नात्याने हजारो व्याख्यानाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या बहि:शाल व्याख्यानमालेचा व्याख्याता म्हणून म्हणून ते प्रबोधन करतात. अनेक शैक्षणिक विषयक लेख,भाषणे असून Hanumantbhopale या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास, शैक्षणिक विकास याविषयावर त्यांचे अनेक व्याख्याने प्रसारित आणि लोकप्रिय झाली आहेत.
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र,संमेलनात त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. गोव्यात संपन्न झालेल्या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन डॉ. हनुमंत भोपाळे यांची राजर्षी शाहू शिक्षण परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार आणि मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव शिवश्री प्रदीप पाटील यांनी डॉ. हनुमंत भोपाळे यांना दिले. या निवडीबद्दल डॉ.हनुमंत भोपाळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.