सामाजिक विकासासाठी विज्ञान, आरोग्यासाठी तृणधान्य व नवमतदार जागृती यातच उज्ज्वल भवितव्याचा पाया – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड| आजची युवा पिढी उज्वल भवितव्यासाठी अनेक आव्हानांचा यशस्वीपणे सामना करत आहे. प्रत्येक क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व विज्ञानाचा अंगीकार केल्याशिवाय पर्याय नाही. या स्पर्धेत टिकण्यासाठी स्वत: हाच आपले आत्मपरीक्षण करुन ज्या क्षमता आपल्यात कमी आहेत त्या वाढविण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी स्वत: समवेत स्पर्धा करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडीयमच्या परिसरात आयोजित युवा महोत्सवाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, डॉ. सान्वी जेठवाणी, जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर आदीची उपस्थिती होती.
सामाजिक विकासासाठी विज्ञान, आरोग्यासाठी तृणधान्य व सक्षम लोकशाहीसाठी नवमतदार जागृती यातच उज्ज्वल भवितव्याचे मार्ग दडले आहेत. प्रत्येकाने सामाजिक जाणिवांचे भान ठेवून आपला विकास साधण्यावर भर दिला पाहिजे. युवकांनी अभ्यासासमवेत खेळ, कौशल्य, आवडीनुरुप एखाद्या कलेची निवड केली पाहिजे. युवा महोत्सव व इतर स्पर्धा या आपण जोपासलेल्या कला, कौशल्याला चालना देतात. याचबरोबर ते हक्काचे व्यासपीठही उपलब्ध करुन देतात असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगून मतदार म्हणून, नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यालाही प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगितले.
आपली संस्कृती जोपासण्या समवेत लोकशाहीच्या सक्षमतेसाठी प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. त्यासाठी आपले नाव मतदार यादीत आहे का याची सर्वानी खात्री करुन घेणे महत्वाचे आहे. निवडणूक विभागाने ही सर्व प्रक्रीया आता ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन दिली आहे. यात अडचण आल्यास मदतीसाठी प्रशासन तत्पर असल्याचे राज्य निवडणूक दूत डॉ. सान्वी जेठवाणी यांनी सांगितले.
एक नागरिक म्हणून देशासाठी, लोकशाहीच्या उज्वल भवितव्यासाठी मतदार म्हणून आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य प्रत्येकाने बजावणेही आवश्यक आहे. यासाठी वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मतदान यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासून घेतले पाहिजे. नसल्यास मतदानासाठी आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी तर सुत्रसंचालन श्रुती रावणगावकर यांनी केले. या दोन दिवशीय युवा महोत्सवात सांस्कृतिक कला प्रकार, कौशल्य विकास, संकल्पनावर आधारित स्पर्धा, युवा कृती इत्यादी कलाकृतीचे आयोजन केले आहे. अधिकाधिक युवकांनी व प्रेक्षकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले.