नांदेड| येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० ची राज्यभरात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या शैक्षणिक धोरणातील वैशिष्ट्ये लाभार्थी विद्यार्थ्यांना कळावी व त्यांना पूढील वर्षी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना येणाऱ्या अडचणी वर माहिती प्राप्त व्हावी. या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि. १७ ते ३० जानेवारी दरम्यान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात शाळा संपर्क (School Connect) अभियान राबविणार आहे.
या अभियानासाठी कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनाखाली प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, विद्यापीठाच्या चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता व विद्यापीठाच्या आयक्यूएसी चे समन्वयक यांची समिती बनविण्यात आली आहे.
ही समिती चारही जिल्ह्यांतील प्रत्येक महाविद्यालयातील प्राचार्य व दोन प्राध्यापकांना साधन व्यक्ती म्हणून दि. १७ जानेवारी रोजी प्रशिक्षण देणार आहे. या साधन व्यक्तींच्या माध्यमांतून चारही जिल्ह्यांतील उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे उद्बबोधन करणार आहे. या सोबतच पदवी स्तरावरील शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर स्तरावर लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची देखील माहीत देणार आहे. या अभियानासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी देखील प्रयत्नशील आहेत. यामध्ये त्यांचा देखील महत्वाचा सहभाग राहणार आहे.