नांदेड, अनिल मादसवार। हदगाव तालुक्यात केलेल्या कामाच्या टेंडरची बिल करण्यासाठी गजेंद्र हिरालाल राजपुत, वय 54 वर्षे, पद अधीक्षक अभियंता, (वर्ग-1) नेमणूक सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड आणि विनोद केशवराव कंधारे, वय 47 वर्षे, पद वरिष्ठ लिपिक, (वर्ग -3), नेमणूक सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांनी 7,50,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी 6,40,000/- रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात चालत असलेला भ्रष्टाचाराचा बिंग फुटले आहे.
यातील तक्रारदार यांना केदारगुडा, पिंगळी, डोंगरगाव, हदगाव, गोरलेगाव, गुरफळी रोड ता. हदगाव, जि. नांदेड या रस्त्यांचे दोन कामांचे टेंडर मिळाले आहे. सदर कामाच्या निवीदा स्विकृतीचे शिफारसीसाठी यातील तक्रारदार हे लाचखोर अभियंता गजेंद्र राजपुत, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांना भेटले असता, त्यांनी मंजुर झालेल्या दोन टेंडरचे एकुण 14 कोटी 10 लाख रूपयाचे अर्धा टक्के रक्कम असे सरसकट 7 लाख रूपयाची मागणी केली. सदर पैसे दिले तर पुढे मुख्य अभियंता, नांदेड यांच्याकडे शिफारस करतो असे सांगितले.
त्यानंतर तक्रारदार हे संबंधीत टेबलचे लिपिक श्री विनोद कंधारे यांना भेटले असता, त्यांनी त्यांचे व त्यांचेसोबत असलेले लिपीक श्री जयंत धावडे यांच्यासाठी प्रत्येक टेंडरचे 25000/- रूपये असे एकुण 50,000/-रूपयाची मागणी केली. सदरचे पैसे हे लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने त्यांना ती देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली.
त्यानंतर दि. 31/10/2023 रोजी व दि. 01/11/2023 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी पाठविले असता, तक्रारदार यांनी गजेंद्र हिरालाल राजपुत, वय 54 वर्षे, पद अधीक्षक अभियंता, (वर्ग-1) नेमणूक सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांची भेट घेतली व सात लाख रूपये जास्त होत आहेत. काही तरी कमी करा अशी विनंती केली असता,अधीक्षक अभियंता श्री राजपुत यांनी तडजोडीअंती सहा लाख रूपयाची पंचासमक्ष मागणी केली व सहा लाख रूपये संबंधीत लिपीक कंधारे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे संबंधीत लिपीक कंधारे यांच्याकडे गेले व राजपुत साहेबांनी सहा लाख रूपये तुमच्याकडे देण्यास सांगितले व त्यांना दोन टेन्डरचे प्रत्येकी 20000/- असे एकुण 6 लाख 40 हजार घेण्यास वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांनी पंचासमक्ष होकार दर्शविला.
त्यानंतर दि. 01/11/2023 रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेडचे कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून 6 लाख गजेंद्र हिरालाल राजपुत, वय 54 वर्षे, पद अधीक्षक अभियंता, (वर्ग-1) यांच्यासाठी व आलोसे विनोद केशवराव कंधारे, वय 47 वर्षे, पद वरिष्ठ लिपिक, (वर्ग -3), नेमणूक सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांच्यासाठी दोन टेंडरचे 40 हजार रूपये असे एकुण 6 लाख 40 हजार पंचासमक्ष लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
दरम्यान लाचखोर अभियंता गजेंद्र राजपूत, अधीक्षक अभियंता, वर्ग-1 यांचे कार्यालय व घर झडतीतून लाचलुचपत प्रतिबंधक नांदेड पथकाने पंचासमक्ष एकूण 72,91,490 रुपये जप्त केले आहेत. दोन्ही लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आले असुन पो.स्टे. शिवाजीनगर, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंत सुरू असुन, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड हे करीत आहेत.
सदर कार्यवाही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड, मोबाईल क्र. 9623999944, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कारवाई पथक अनिल कटके, पोलीस उप अधीक्षक, गजानन बोडके, पोलीस निरीक्षक, सपोउपनि श्री गजेंद्र मांजरमकर,पोह/ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुंढे, गजानन पवार, चापोह/शेख अकबर, पोना/राजेश राठोड, पोकॉ/अरशद खान, ईश्वर जाधव, चापोना/गजानन राउत, प्रकाश मामुलवार ,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र, नांदेड तर तपास अधिकारी राजेंद्र पाटील पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड मोबाईल क्र.7350197197 यांनी केली आहे.
या कार्यवाही नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तर्फे नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम, एजेंट यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, दुरध्वनी क्रमांक 0246253512 टोल फ्रि क्रं.1064 असे कळविले आहे.