टीबी फोरमची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न
नांदेड| क्षयरोग दूर करण्यासाठी जास्तीत जास्त संशयीत लोकांची तपासणी करणे व निदान झालेले क्षयरुग्ण यांना औषधोचाराखाली आणणे हा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना नियमित औषधोपचारखाली आणावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. जिल्हा टी बी फोरम समितीचा आढावा घेतांना ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतिश कोपुरवाड, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय परके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या झिने, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. मो. बदिउद्दीन, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणपत मिर्दुडे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. मो. खाजा मोईनुद्दीन आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले, जास्तीत जास्त संशयित क्षयरुग्णांना शोधून त्यांचे निदान करण्यासाठी तपासणी करावी व क्षयरुग्ण आढळल्यास त्याला औषधोपचाराखाली आणून बरे करावे. 2023 वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातील 95 ग्रामपंचायतीची पडताळणी करण्यात आली व त्यांच्यामध्ये 86 ग्रामपंचायत टी बी मुक्त ग्रामपंचायत प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले आहे व हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत विकास आराखडामध्ये भरीव निधीची तरतूद करण्यात आली.
त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल पंचायत राज मंत्रालय दिल्ली यांच्याकडून घेण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांचे अभिनंदन केले.