“सगे सोयरे” अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी अधिवेशनात भुमिका मांडा, अन्यथा मतदार संघात फिरू देणार नाही -मराठा सेवक श्याम पाटील वडजे
नांदेड,अनिल मादसवार| 20 फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात “सगे सोयरे” अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायदा पारीत करण्यात यावा, याविषयावर आमदार महोदयानी सभागृहात आपला आवाज उठवावा अन्यथा येणाऱ्या काळात सकल मराठा समाज आपणास मतदार संघात फिरू देणार नाही असा सवाल करीत आपल्या मागण्यांचे निवेदन हे दक्षिण विधानसभा मतदार संघांचे आमदार मोहनराव हंबर्डे यांना आज सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले.
काल निघालेल्या नोटिफिकेशन वरून आम्हां समजले आहे की, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने दि.20 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. तरी सदरील अधिवेशनात आपण आपली भूमिका मांडत असताना 27 जानेवारी रोजी सरकारने दिलेल्या अधिसुनेची आठवण करून देत, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी कुणबी जात प्रमाणपत्र हे आवश्यक आहे आणि कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सदरील अर्जदाराची 1967 पुर्वी असलेली “कुणबी” नोंद ही सापडणे अत्यावश्यक आहे, परंतु शासनाच्या अनागोंदी कारभारामुळे आपल्या भागातील मराठा समाज हा कुणबी असुन सुद्धा त्यांची कुणबी नोंद ही शासकीय दप्तरात सापडत नाही, यांस पूर्णतः शासन जबाबदार आहे.
कारण अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयातील असणारे दस्ता्वेज हे जीर्ण झालेत, गहाळ झालेत तर काही ठिकाणी जाळून टाकण्यात आलेत त्यामुळे अनेक गाव आणि तालुक्यातून “निरंक” अहवाल जात आहे. याचा परिणाम अतिशय अत्यल्प नोंदी सापडण्यावर होत आहे. करिता पूर्वपार कुणबी असणारा मराठा समाज हा शासनाच्या चुकीमुळे ओबीसी प्रवर्गात जाण्यापासून वंचित राहु नये यासाठी ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सजातीय विवाह संबंधातील नातलगाना कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी “सगे सोयरे” कायद्याची अंमलबजावणी होणे हे अतिशय आवश्यक आहे.
सदरील निवेदनाच्या माध्यमातून सकल मराठा समाज, नांदेड च्या वतीने विनंती करण्यात आली की,आपण 20 तारखेच्या विशेष अधिवेशनात “सगे सोयरे” कायद्याच्या अंमलबजावणी साठी आपला आवाज सभागृहात उठवावा अशी विनंती सकल मराठा समाज नांदेड च्या वतीने देण्यात आले. यावेळी उपस्थित मराठा सेवक श्याम पाटील वडजे, बालाजी पाटील कदम, सुभाष पाटील शिंदे, नाना पाटील वानखेडे, गोविंद पाटील कदम, जयसिंग हंबर्डे, शिवराम मामा लुटे यासह इतर समाज बांधव उपस्थित होते.