हिमायतनगर,अनिल मादसवार| कालपासून वातावरणात बदल होऊन, काही भागांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून, रब्बी हंगामातील उर्वरित पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान गुरुवारी वीज पडून बोरगडी येथील एका शेतकऱ्याची म्हैस दगावल्याने मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यात ४४ अंश सेल्सिअस तापमान असल्याने प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता. गुरुवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. शहरात नगरपंचायतीच्या दुर्लक्षित कारभाराचे पितळे उघडे पडले असून, जिकडे तिकडे उघड पडताच धूळ आणि पाऊस पडताच तळे साचल्याने निर्माण होणारे चिखलमय रस्त्याने नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
गुरुवारी दुपारी हिमायतनगर तालुक्यात विजांचा कडकडाट होऊन वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला. तालुक्यातील मौजे बोरगडी येथे गट क्रमांक 174 मध्ये वीज कोसळून एक दुभती म्हैस दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज १० लिटर दूध देणारी म्हैस दगावल्याने दिगाबर लिंगणा काईतवाड या शेतकऱ्याचे अंदाजे 1 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली जात आहे. मृग नक्षत्र एका दिवसावर येऊन ठेपला असताना पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. वातावरण बदलताच शहरातील कृषी दुकानात शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली असून, पेरणीच्या तयारीसाठी खते, बी-बियाणे खरेदीची तयारी सुरु आहे.