
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरात गेल्या ३०० वर्षापेक्षाही अगोदरपासूनच्या दिवाळीच्या पर्वकाळात परंपरेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून काढण्यात येणाऱ्या कार्तिक काकडा आरती दिंडीत दिवसेंदिवस वारकऱ्यांची संख्या वाढत आहे. दिवाळी पर्व सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांच्या मुलांची दिवाळी साजरी व्हावी यासाठी श्री परमेश्वर मंदिर समितीने ५०० गोरगरीब विद्यार्थ्यांना ड्रेस तर काकडा आरती दिंडीत सामील असलेल्या भजनी मंडळास स्वेटर वितरित करून दिवाळी साजरी केली आहे. मंदिर समितीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
कर्नाटक – तेलंगणा, राज्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर/वाढोणा येथील परमेश्वर मंदिर देवस्थानला श्रीक्षेत्राचा दर्जा मिळाल्यापासून मंदिर समितीतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. या अध्यक्ष म्हणून तहसीलदार हे काम पाहतात. तर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्याकडे तर सेक्रेटरी पदाची धुरा आजच्या घडीला अनंतराव देवकाते यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी यंदाची दिवाळी गोरगरिबांची मुले-मुली व भजनीमंडळासोबत साजरी व्हावी यासाठी स्तुत्य उपक्रम राबविला. याउपक्रमातून श्री परमेश्वर मंदिर कमिटीतर्फे एक ते आठ वर्ष वयोगटातील ५०० मुला-मुलींना नवीन कपडे व काकडा आरती दिंडीत सामील होणाऱ्या भजनी मंडळ वारकऱ्यांना स्वेटर वितरित करून त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे.
यापूर्वी मंदिर कमिटीच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम राबविण्यात आले असून, त्यात शहर व तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वितरित केले होते. त्यानंतर गोरगरिबांना अल्प दारात रुग्ण सेवा मिळावी म्हणून एक रुग्णवाहिका केवळ डिझेल वर चालविण्याची सोय उपलब्ध केली असून, ती आजही अविरतपणे सुरु आहे. तसेच मंदिराच्या विकास कामाची घोडदौड सुरूच असून, मंदिराच्या परिसराचा कायापालट केला आहे. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिराचा आकर्षण दिसावे म्हणून रंगबिरंगे कारंजे लावण्यात आले आहेत. यासह अनेक विकास कामे सुरु असून, आगामी काळात देखील हे उपक्रम सुरु राहतील अशी माहिती दिली. यावेळी मंदिर कमिटीचे संचालक लताबाई पाध्ये, प्रकाश शिंदे, लताताई मुलंगे, मथुराबाई भोयर, माधव पाळजकर, अनिल मादसवार, संजय माने, गजानन मुत्तलवाड, विलास वानखेडे,लुम्दे पाटील आदींसह इतर संचालक, भजनी मंडळी, गोरगरीब बालके व नागरिक उपस्थित होते.
काकडा आरती दिंडीत चक्क खंडोबा सामील
कोजागिरी पौर्णिमाच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरु झालेल्या काकडा आरती दिंडीत गेल्या ७ दिवसापासून चक्क खंडोबा सामील झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळात आहे. सकाळी ५ वाजता शहरातील श्री परमेश्वर मंदिरातून निघणाऱ्या दिंडीसोबत खंडोबा सामील होत असून, शहरातील सर्व देवी देवतांच्या ठिकाणी देखील खंडोबा येत असल्याने नागरिक दिंडीतील वारकऱ्याबरोबर थेट खंडोबालाही हार अर्पण करून स्वागत करत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.
