पोवाड्यांनी जागविला सयुक्त महाराष्ट्राच्या रणसंग्रामाचा इतिहास
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व दयानंद महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०२३ या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात राजश्री शाहू महाराज मुख्यमंचावर पहिला दिवस पोवाडा या कलाप्रकाराने गाजवला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित पोवाड्यांनी प्रेषकांच्या अंगावर रोमांस उभारले. त्याचबरोबर स्वच्छतेचा संदेश देणारे मतदान जनजागृती, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आदी विषयावर युवा कलावंतांनी खास पेहरावा पोवाडा सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
नांदेडच्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या कलावंतांनी मतदान जागृतीवर पोवाडा गात मतदानाचे महत्व पटवून सांगितले. या कलाप्रकारात युवा राहेगावकर, श्रुती जम्बुडे, वैष्णवी सावरकर, दुर्गेश्वरी वाघमारे यांनी सहभाग घेतला. नांदेड जिल्ह्यातील बी. बी. ए. एस. या शंकर नगरच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकृत्त्वावर पोवाडा सादर केला. यामध्ये रूपाली सोनकांबळे, प्रतीक्षा एलकेपाडे, राजश्री बोडके, निकिता तवटे, महम्मद भागापले यांचा सहभाग होता. तरुणांनो जागे व्हा व्यसनाच्या आहारी जाऊन आयुष्य उदवस्त करू नका हा व्यसनमुक्तीचा पोवाडा दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकरच्या युवा कलावंतांनी सादर केला. त्यामध्ये योगेश वराळे, श्याम वैद्य, पांडुरंग बोरकर, सुमित येरेकर, साईनाथ भिसे यांनी सादर केला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा बालपणापासून ते लोकशाहीर हा प्रवास प्रवास पोवाड्यातून समोर आणत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे योगदान समोर आले. श्री. शिवाजी कॉलेज कंधारच्या शाहीर घनश्याम पेटकर, सुमित वानखेडे, विशाल वरपडे, प्रिया कदम, रोहिणी लोंढे, सरस्वती वाघमारे आदी कलावंतांनी पोवाड्यातून महाराष्ट्राचा इतिहास उभा केला. यावेळी मुख्य मंचावर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, सल्लागार समितीचे डॉ. एस.आर. जाधव, डॉ. प्रताप देशमुख, डॉ. बालाजी भंडारी, डॉ. राजपाल चिखलीकर आदी उपस्थित होते.