हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरात रेंगाळलेले राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम गेल्या महिन्याभरा पासून सुरुवात झाले आहे. मात्र सदरचे काम करताना ठेकेदारा कडून निकृष्ट कारभार केला जात असून, पुलाचे बेड चिखलात टाकून थातुर माथूर काम केले आहे. एव्हढेच नाहीतर रात्रीत या पुलाच्या कामापासून ये जा करताना तासनतास वाहतूक खोळंबत असून, यामुळे प्रवाश्याना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ या पुलाचे काम दर्जेदार पद्धतीने करून प्रवाशी नागरिकांनी होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी शहरासह ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकातुन केली जात आहे.
हिमायतनगर शहरातून जात असलेल्या धानोडा – माहूर- किनवट- हिमायतनगर – भोकर या रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला. मंजुरी निधी प्रमाणे भविष्यातील २५ वर्ष टिकतील असा रस्ता आणि ज्या शहरातून रस्ता जातो तेथील रुंदीकरण करून येणाऱ्या काळात अपघात होणार नाहीत. यासाठी शहरातून फोर-वे रस्ता, रस्त्यामध्ये १० फुटाचे डिव्हायडर, पेट्रोल पंपापासून उड्डाण पूल आणि रेल्वेपूल करण्यास मंजुरी दिली होती. मात्र राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना काही मर्जीतील लोकांना सांभाळण्यासाठी शहरातील रस्त्याची रुंदी कमी केली. एवढेच नाहीतर डिव्हायडर गायब करून उड्डाण पूलही रद्द करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट कामामुळे पावसाळयात चिखल तर उन्हाळ्यात धुळीने नागरिक व वाहनधारक ञस्त झाले आहेत.
एव्हढेच नाहीतर ठेकेदाराने शहरांनजीक असलेला पूल खोदून निकृष्ट पद्धतीने पुलाचे काम करण्याचा घाट रचला आहे. आत्तातरी पुलाचे काम करण्याची गती संत झाली आहे. त्यामुळे दिवस व रात्रीला या पुलाजवळ तासंतास वाहतूक ठप्प होत असून, प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी येथे रेडियम सूचना फलक लावली नसल्याने अनेकजण येथे घसरून पडून किरकोळ जखमी झाले आहेत. त्यानंतर देखील दिवस काम चांगले व रात्रीला थातुर माथूर केले जात आहे. त्यामुळे दोन वेळा सदरचे काम गावातील नागरिकांनी थांबवून ठेकराला इशारा दिला होता, मात्र गावातीलच काही स्वार्थी लोकांमुळे हे काम पुन्हा पूर्वीप्रमाणेच केले जात आहे. त्यामुळे भविष्यात या पुलामुळे धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एकूणच संत गतीने व अर्धवट राहिलेल्या रस्ता व पुलामुळे नागरिक वाहनधारक व्यापारी कमालीचे वैतगाले असुन, या बाबतीत अनेकवेळा तक्रारी करुन कुठेही दखल होत नसल्याने कञाटदाराकडुन सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे व्यवस्था होत नसल्याचे दिसुन येत आहे. आज मंगळवारी तर दिवसा तासभर वाहतूक ठप्प झाली यामुळे अतिजलद कामासाठी ये – जा करणाऱ्यांना ताटकळत बसावे लागले होते. त्यामुळे अनेकांनी ठेकेदारच्या कार्यपद्धती बद्दल नाराजी व्यक्त केली आहे.