भंडाऱ्यातून भाविकांना विषबाधा; कोष्ठेवाडी येथील संत बाळू मामा पालखी सोहळयातील घटना
लोहा/ नांदेड| नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावरगाव कोष्ठवाडीत संत बाळूमामांच्या सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमातील भगर व आमटीच्या महाप्रसादातून 1500 ते 1745 भक्तांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ही घटना घडली. विषबाधेनंतर गावकऱ्यांना लोहा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना नांदेडच्या शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. रात्री उशिरा झालेल्या विषबाधेच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून सर्व रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोहा तालुक्यातील कोष्टवाडी परीसरात संत बाळुमामा यांच्या पालखी सोहळ्यात मंगळवारी एकादशी असल्याने आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर भंडारा प्रसाद होता. यात भाविकांना उपवास असल्याने भगर वाटप करण्यात आली. या सोहळयात सावरगाव, कोष्टवाडी, हरणवाडी, पेंडु, सादलापुर, रिसनगाव आष्टुर, देवाला तांडा, सह परीसरात अन्य गावातील दोन ते अडीच हजार भाविक सहभागी झाले होते. येथील महाप्रसाद खाल्यानंतर विषवाधा होऊन बुधवारी पहाटे हजारो भक्तांना मळमळ, उलटी, लो-बीपी व अन्य शारीरिक त्रास सुरू झाला. ही बाब लक्षात येताच नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने शासकीय रुग्णालय लोहा तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर एसटी बससह अन्य खाजगी वाहनांने अनेकांना शासकीय रुग्णालय नदिड, अहमदपूर, पालम येथे दाखल करण्यात आले आहे. सर्वांवर उपचार सुरु असुन या घटनेमुळे प्रशासन हादरून गेले आहे.
कोष्ठवाडी येथील विषबाधेची माहिती दिल्ली येथे असलेल्या खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कळाली. तेव्हा तातडीने त्यांनी दिल्लीतून नांदेड प्रशासनास सुचना देऊन वैदयकीय सेवा व इतर मदत पोहचविण्यास सांगतीले. जिल्हा शल्यचिकित्सक यांना तातडीने औषधी उपलब्ध करून देण्या बाबत सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार नांदेडच्या लोहा तालुक्यातील कोष्ठवाडी येथे दोन दिवसांपासून संत बाळू मामा यांचा सप्ताह सुरू आहे. आजूबाजूच्या गावातील हजारो भाविक दर्शनासाठी आले होते. मंगळवार एकादशीनिमित्त दर्शनसाठी गर्दी होती. एकादशीच्या निमित्तानं भगर व आमटीचा महाप्रसाद होता. मात्र या प्रसादातून चार हजार भाविकांनी हा प्रसाद घेतला होता त्यापैकी 1745 भक्तांना विषबाधा झाल्याची घटना घडली. विषबाधा झालेल्याना मळमळ, उलट्या होऊ लागल्याने भाविकांना लोहा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णांची संख्यावाढत असल्याने एसटीसह खाजगी वाहनाने अहमदपूर, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात देखील रूग्णांना उपचाराठी भरती करण्यात आले आहे.
त्यामुळे रूग्णालयात मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. रुग्णांमध्ये सावरगाव, कोष्ठवाडी, हरणवाडी, रिसनगाव, पेंडू, मुरंबी आदी गावातील भाविकांचा समावेश आहे. सध्या विषबाधा झालेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. सर्वांना उपचार प्रकिया चालु असुन, शेजारील जिल्ह्यात देखील असाच प्रकार घडल्याने त्याची देखील प्रशासनामार्फत चौकशी चालू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. दरम्यान कोणताही रूग्ण दगावला नाही अथवा कोणाही गंभीर अवस्थेत नाही, आवश्यक वाहने, बंदोबस्त सुरू आहेत, असे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी सांगतीले.
लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे महाप्रसाद कार्यक्रमानंतर भाविकांना विषबाधा झाल्याची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचे स्थानिक आ. मोहन हंबर्डे लोहा तालुकाध्यक्ष शरद पवार व इतर कार्यकर्ते व जागरुक नागरिकांना रुग्णांची काळजी घेण्याच्या सुचना दिल्या. यानंतर नदिड येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास बुधवारी सकाळी भेट देऊन माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी रुग्णांची विचारपूस केली. यानंतर अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांचीशी चर्चा करून उपचाराची माहिती घेतली. रुग्णालयात भेटी देऊन रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अब्दुल बारी यांच्याशी उपचाराबाबत चर्चा केली. यानंतर विष्णुपुरी येथील त्यांनी भेट देत रूग्णांना धीर दिला.