पुणे| अनुभवातून आलेल्या साहित्यकृतीला आपलेपणाची धार असते. ते साहित्य अनेकांच्या आयुष्याला वळण देण्यास कारणीभूत ठरते. कविता हे साहित्यामधले वेगळेपण दाखवणारा एक वेगळा आविष्कार आहे. अंतर्मनाचा सूर जेव्हा छेडला जातो, तेव्हा कविता नावाचे मिश्रण तयार होते. कवितेतून आपल्या भावना प्रांजळपणे प्रगट होतात. कविता एक भावनिक रसायन आहे. ज्या रसायनाच्या माध्यमातून आयुष्याचा गोडवा सातत्याने पाझरत असतो. कविता म्हणजे प्रामाणिक अंतर्मनातला सूर आहे, असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, साहित्य रसिक शरद पवार यांनी व्यक्त केले.
पत्रकार, लेखक, संघटक संदीप काळे यांच्या ‘कोवळी पाने’ कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. त्यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार,कुमार सप्तर्षी, प्रकाश पोहरे, श्रीराम पवार, जयश्री खाडिलकर, संजय आवटे, चंद्रमोहन पुपाला यांची उपस्थिती होती. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, मी संदीप काळे यांच्या अकरा पुस्तकांचे आतापर्यंत प्रकाशन केले आहे. त्या अकराही पुस्तकांमध्ये मला माणुसकीभोवती असणारे विचार प्रवाह विकसित करण्याचा यशस्वी प्रयत्न झाल्याचे पाहायला मिळते. वेदनेवर माणुसकीची फुंकर घातल्यावर आपलेपणाचे भाव दिसू लागतात, हीच खासियत संदीप काळे यांच्या लिखाणाची आहे, असेही यावेळी शरद पवार म्हणाले. उपस्थित सर्व मान्यवरांची यावेळी भाषणे झाली.
यावेळी बोलताना संदीप काळे म्हणाले, सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या माझ्या ‘कोवळी पाने’ या कवितासंग्रहामध्ये शेती, संस्कृती, नातेसंबंध या विषयांच्या महत्त्वपूर्ण कविता आहेत. ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुरेश सावंत यांची प्रस्तावना या कवितासंग्रहाला आहे, तर ‘बारोमासकार’ सदानंद देशमुख यांनी कवितासंग्रहाची पाठराखण केली आहे. शेती, माती, आणि वेदनेला समर्पित केलेला हा कवितासंग्रह वाचकांच्या पसंतीस नक्की पात्र ठरेल.
संदीप काळे यांचे लिखाण थक्क करणारे – कोवळी पाने हे संदीप काळे यांचे ६९ वे पुस्तक. सर्व विषयात संदीप काळे यांचे पुस्तके आहेत. आतापर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून संदीप काळे यांची ६८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मु. पो. आई, ट्वेल्थफेल, ऑल इज वेल, प्रेमसेतू या चार पुस्तकांनी खपाचे सर्व रेकार्ड केले आहेत. ही पुस्तके सर्व भाषांत आली असून अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाला लागली आहेत. वर्ल्ड रेकार्ड, इंडिया बुक रेकार्ड आणि लिमका बुक रेकार्डमध्ये संदीप काळे यांनी लिखाणाच्या माध्यमातून अनेक रेकार्ड केले आहेत. साहित्य, शासन, सामाजिक संस्था आणि पत्रकार संघातर्फे संदीप काळे यांना आतापर्यंत ३८० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत एकूण २६ देशांचा परदेशी अभ्यास दौरा केला आहे. अनेक पत्रकारिता महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणूनही सेवा बजावली आहे. काळे यांचा ‘भ्रमंती लाईव्ह’ हे सदर खूप लोकप्रिय आहे. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या देशातील नंबर एकच्या पत्रकार संघटनेचे संदीप काळे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ‘व्हाईस ऑफ मीडिया’मध्ये देशात सदतीस हजार पत्रकार सदस्य काम करतात. आता १९ देशांत ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे काम पोहचले.