श्रीक्षेत्र माळेगाव| कंधार तालुक्यातील बामणी येथील कुस्तीपटू परमेश्वर जगताप याने परभणीचा रमेश पुंडलीक तुडमेवर मात करीत माळेगाव केसरीचा बहुमान पटकावला. यावेळी विजेता परमेश्वर जगताप याचा माळेगाव केसरी किताब व गदा देऊन गौरव करण्यात आला.
माळेगाव यात्रेचे विशेष वैशिष्ट्य ठरणारी कुस्त्यांची दंगल शुक्रवार दिनांक 12 जानेवारी रोजी माळेगावात मोठ्या प्रमाणात झाली. राज्यातून विविध विभागातून आलेल्या मल्लांनी आपले बळ अजमावले. काही जणांना पराभवाची धूळ चाखावी लागली. अत्यंत चुरशीच्या दंगलीत मल्लांच्या ताकतीचा कस लागत होता. घेण्यात आलेल्या कुस्ती दंगलीत प्रथम क्रमांकाची कुस्ती कंधार तालुक्यातील बामणी येथील मल्ल परमेश्वर जगताप यांनी जिंकत माळेगाव केसरीचा बहुमान पटकावला. मानाचा फेटा, चांदीची गदा व 31 रोख रक्कम देण्यात आली. रमेश पुंडलिक तुमडे हा उपविजेता ठरला.
21 हजाराच्या कुस्तीमध्ये पुणे येथील सुहास घोडके प्रथम तर उपविजेता सुरज मुलानी, सोलापूर, 11 हजाराच्या कुस्तीमध्ये सुनेगाव तालुका लोहा येथील सचिन जाधव विजेता तर उपविजेता लातूर येथील दीपक सरवदे, 9 हजाराच्या कुस्तीमध्ये दिलीप बामणे विजेता तर उपविजेता विष्णू ताकपुरे, सात हजाराच्या कुस्तीमध्ये लातूर येथील तुकाराम महानौर विजेता तर उपविजेता माऊली महानौर ठरला. 5 हजाराच्या कुस्त्यांमध्ये माळाकोळी तालुका लोहा येथील मल्ल दीपक रोहिदास कागले हा हा विजेता ठरला नांदेड येथील शोयब यांनी हा उपविजेता ठरला आहे . यावेळी बक्षिसाच्या रकमेतील उपविजेत्यांना वीस टक्के रक्कम देण्यात आली.
दुपारी सुरू झालेल्या कुस्त्या रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. यावेळी लोहा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डी.के आडेराहो, विस्ताराधिकारी डी. आय. गायकवाड, धनंजय देशपांडे, पी.एम. वाघमारे, गजानन शिंदे, सतीश चोरमले, संभाजी धुळगंडे, हनुमंतराव धुळगंडे, लखन चौधरी, अमृत शिंदे, परशुराम कौशल्य यांच्यासह लोहा पंचायत समितीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.