पुणे येथे डेंगी मलेरियाच्या गंभीर रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी कार्यशाळेचे आयोजन
पुणे। सध्या जगामध्ये कीटक जन्य आजाराचा वाटा जवळ जवळ १७ टक्के असून दरवर्षी साधारणतः सात लाख ते १० लक्ष मृत्यू या आजारामुळे होतात. सद्यस्थितीत डेंग्यू व हिवताप रुग्नांमध्ये झपाट्याने वाढ झालेली दिसून येत आहे .याचे कारण म्हणजे झपाट्याने वाढते शहरीकरण ,बदलते हवामान , वाढते तापमान आणि विषाणू – डास – मानव यांच्यातील बदलते समीकरण. हवामान बदलामुळे डेंग्यू हा जागतिक चिंतेचा विषय बनला आहे.
डेंग्यू तसेच काही मलेरिया रुग्नापैकी बऱ्याच जणांना सौम्य लक्षणे दिसून येतात व त्यांना रुग्णालयात दाखल करायची गरज पडत नाही. मात्र काही रुग्णांची प्रकृती अचानक बिघडून हा आजार त्यांच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे आपण डेंग्यू मलेरियाच्या रुग्नावर उत्तम इलाज करून त्यांच्या आजाराची गंभीरता तसेच मृत्यूचे प्रमाण कमी करणेसाठी रुग्णाचे व्यवस्थापन कसे करायचे, त्यासाठी त्याला अद्यावत उपचार कश्या पद्धतीने करावा आणि हे सर्व आपल्या सरकारी रुग्णालयात कसे मिळेल यासाठी राज्यातील चार विभागातील ठाणे पुणे कोल्हापूर व औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयातील बालरोगतज्ञ आणि भिषक (Physician) यांचे दोन दिवसांची कार्यशाळा दिनांक ११-१२ जानेवारी २०२४ रोजी पुणे येथे संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी PATH , Godrej, CHRI, FH India या सेवाभावी संस्थेचा मोलाचा सहभाग आणि सहकार्य लाभले. या कार्यशाळेच्या उदघाटनासाठी राज्याचे नूतन सहसंचालक डॉ राधाकिशन पवार सर, PATH या संस्थेचे साथरोग आजारांचे संचालक डॉ सत्यव्रत राऊतराय तसेच याच संस्थेचे डॉ बिस्वाल सर डॉ सतीश ताजने आणि राज्याचे राज्य किटक शास्त्रज्ञ डॉ महेंद्र जगताप हे उपस्थित होते.
रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा – या उक्तीनुसार या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यामधील इतर खाजगी तसेच सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करून याचा फायदा गोर गरीब रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी करावा असे प्रतिपादन राज्याचे सहसंचालक डॉ राधाकिशन पवार यांनी केले.
या कार्यशाळेमध्ये डॉ सुवर्णा जोशी प्रा. बी जे मेडिकल कॉलेज यांनी या आजारांची तपासणी कशी अद्यावत पद्धतीने केली जाते याबाबत मार्गदर्शन केले. तर वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ दिलीप कदम यांनी इतर आजार असलेल्या व्यक्तींना जर या कीटक जन्य आजारांची बाधा झाल्यास त्यांचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते ते अत्यंत प्रभावीपणे सांगितले. डॉ सविता कांबळे यांनी गर्भवती स्त्रियांना या आजाराची लागण झाल्यावर त्यांना उपचार कसा करावा हे सांगितले. या आजारामध्ये किटकशास्त्रीय सर्वेक्षणाचे महत्व डॉ महेंद्र जगताप यांनी सांगितले. तर डॉ प्रदीप आवटे सहाय्यक संचालक नागपूर यांनी साथरोगांचा इतिहास आणि त्याचा अभ्यास व चिकनगूनिया या आजाराचे व्यवस्थापन कसे करावे हे सांगितले. गंभीर हिवताप रुग्णांना उपचार कसा करावा याबाबत डॉ हर्षल पांडवे विभागप्रमुख YCM वैद्यकीय महाविद्यालय पिंपरी चिंचवड मनपा पुणे यांनी मार्गदर्शन केले.
सगळ्यात महत्वाची भूमिका डॉ छाया वळवी असिस्टंट डीन सर जे जे महाविद्यालय मुंबई व डॉ नागनाथ रेड्डीवार प्रपाठक बी जे मेडिकल कॉलेज यांची होती त्यांनी डेंग्यू रुग्णांचे व्यवस्थापन कसे सहज आणि सोप्या पद्धतीने कसे करावे हे चार रुग्णांचे अभ्यास (केस स्टडी) प्रशिक्षर्थिना करायला लावून याचे प्रात्यक्षिकच त्यांचेकडून करून घेतले. प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणाची केलेली स्तुती मात्र आम्हाला अंगावर मूठभर मांसच देऊन गेली. त्यामुळे *याच साठी केला होता हा अट्टाहास*!!! या उक्तीनुसार थोडी मनाला उभारी मिळाली. याचे सर्व श्रेय मात्र डॉ नेहा वाघ डॉ अमित गंभीर श्री राहुल राठोड यांना जाते.