नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने आज मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
नांदेड| राज्यातील समस्त मराठी पत्रकारांच्या स्वाभिमान आणि न्याय हक्कासाठी सदैव पुढाकार घेऊन तन, मन आणि धनाने लढा उभारणाऱ्या मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या 85 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभरात पत्रकारांच्या आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा मराठी पत्रकारांचे सक्षम नेतृत्व एस.एम.देशमुख यांनी दिले आहेत.
त्यानुसार नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या रविवार दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता शहरातील जंगमवाडी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालय येथे पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर देखील अशा आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करावे, असेही सूचित करण्यात आले आहे. अशा प्रकारे मागील वर्षी देखील जंगमवाडी येथील रुग्णालयात असेच शिबीर आयोजित केले होते. त्यास पत्रकार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
उद्या रविवारी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे , अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार , महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, उपायुक्त तथा विधी अधिकारी अजितपालसिंघ संधू आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचा समारोप करण्यात येणार आहे. तरी शहरासह जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी या आरोग्य तपासणीसाठी सकाळी वेळेवर उपासीपोटी उपस्थित राहून या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, सरचिटणीस राम तरटे, प्रसिध्दी प्रमुख माधव गोधणे,महानगराध्यक्ष शिवराज बिच्चेवार, सरचिटणीस बजरंग शुक्ला, रविंद्र संगनवार, सुरेश काशिदे,प्रल्हाद लोहेकर, प्रशांत गवळे आदींनी केले आहे.