किनवट पंसचा एकचं नारा…रोजगार हमी अर्धे तुम्हीं अन् अर्धे हामी.!
नांदेड/किनवट। मागेल त्याला काम अन् कामाचे दाम अशी महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी योजना असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजना 2005 मधे महाराष्ट्रात पंचायत समितीच्या मार्फत गाव पातळीवर गोरगरीब जनतेसाठी राबविण्यात आली होती आणि या योजनेला केंद्र सरकारने 2011 मधे संपूर्ण देशात लागू केली होती.
त्या रोजगार हमी योजनेचे किनवट तालुक्यात तीन तेरा वाजेलेले आहेत.येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी तर फक्तं आणि फक्तं गोरगरीब मजुरांचा अज्ञानाचा फायदा उचलत कागदोपत्री आणि फोटो सेशन पूर्ती नोंद दाखवत अफाट माया जमा केली आहे. तालुक्यात राबविण्यात आलेल्या पांदन रस्ते कामाची तर अक्षरशः विल्हेवाट यांनी लावलेली आहे.बोगस मजूर दाखवून त्यांचे नावावर मजुराला माहीत न होवू देता खाते खोलत त्यामार्फत करोडो रुपयांची उचल परस्पर करण्यात आलेल्या आहेत.
किनवट पंचायत समिती याला अपवाद कशी राहिलं.! इथे कार्यरत कर्मचाऱ्यांनी मुळात जवळ जवळ सर्वच कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत आणि मागील दहा पंधरा वर्षे अर्थात ते इथे कामावर लागले तसे इथेच मग्रारोहयो या विभगाताच काम करत आहेत त्यांना या विभागाचे कच्चे आणि पक्के दुवे सगळेच माहिती आहेत.इथे कार्यरत असलेल्या लोकांनी एकसुत्री कार्यक्रम राबविलेला आहे रोजगार हमी अर्धे तुम्हीं अन् अर्धे हामी ज्यामुळे रोजगार हमी योजना किनवट सारख्या आदिवासी तालुक्यात कुचकामी आणि फसवी ठरलेली आहे.
पांदन रस्ते कामातील भ्रष्टाचार बाबत गावातील लोकांनी आवाज उठवला तर त्याला एकतर दाबले जाते किंवा फिरवा फिरवी करत त्यांना मेटकुळीस आणून त्यांना त्यांचा अंत पाहिला जातो.कोठारी (सी) येथील पांदन रस्ते कामातील भ्रष्टाचार बाबत गुन्हे दाखल करण्याचे मा.तहसीलदार यांनी आदेशित केले होते परंतु आज पर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.
असाच बोगस पांदन रस्ते कामातील काहीसा प्रकार बोधडी (खु) या गावात झालेला आहे.इथे साधारणत 2013 मधे करण्यात आलेल्या पांदन रस्त्यावर आता सन 2023 मधे पुन्हा 24 लाख आणि 24 लाख रुपयांची दोन कामे अर्थात 48 लक्ष रुपयांचे पांदन रस्ता काम चालू आहे. जुन्या पांदन रस्त्यावर पुन्हा थातूरमातूर नाममात्र काम करीत बोगस मजूर दाखवून मस्टर बनवत निधी लाटला जात आहे.याबाबत गावातील सुज्ञ नागरिक यांनी गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती कार्यालय किनवट यांना लेखी निवेदन देत वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
परंतु इथे कार्यरत असलेल्या रोजगार सेवक,अभियंता तांत्रिक सहायक येरेकार आणि गट विकास अधिकारी वैष्णव साहेब यांनी या गोरगरीब शेतकरी लोकांना माझा कडे माहिती आणि फोटो नाहीत त्यांचा कडे जा,त्यांनी यांचेकडे जा अशी फिरवा फिरवी केली आहे.प्रत्यक्ष चालू असलेल्या पांदन रस्त्यावर जावून माहिती घेतली असता तर वस्तुस्थिती स्पष्टच दिसली की जुन्या कामांवर नवीन काम दाखवत बिले उचलण्याचा प्रकार चालू आहे.इथे सकाळी शेती कामासाठी जाणाऱ्या महिला आणि पुरुष यांना उभे करत फोटो काढले जात आहेत.
तिथे कामावरून परतणाऱ्या महिलांनी तर आम्ही कामचं केले नाही पण आम्हाला उभे करून फोटो काढून घेतले आहेत याचा पाढाच कथन करून सांगितला.तांत्रिक सहायक येरेकार यांना फोन वर विचारणा केली असता त्यांनी सुरवातीला 24 लाखांचे एकच काम चालू असल्याचे सांगितले त्यावर त्यांना गावातील लोकांनी 48 लाखाचे काम आहे असे म्हणत असल्याचे सांगितले तर त्यांनी म्हंटले की 24 लाखाचे एक आणि आणखीन 24 लाखाचे एक अशी दोन कामे चालू असल्याचे सांगितले.एकंदर त्यांची बोलण्याची शैली बघता त्यांनी 24 लाखाचे दुसरे काम लपविण्याचा का प्रयत्न केला हे बघण्यासारखे राहिलं.!
तर अशी ही रोजगार हमी योजना गोरगरीब जनतेचा हाताला काम म्हणून राबविण्यात येत आहे की इथे कार्यरत कर्मचाऱ्यांचा सर्वांगीण विकासासाठी राबवत आहे हा मोठा प्रश्न जनतेला पडलेला आहे.