नांदेड| दि.७ जानेवारी रोजी दुपारी एक ते चार या वेळेत जंगमवाडी दवाखाना येथील प्रशिक्षण हॉल मध्ये आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणाची जननी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने संघटनात्मक मेळावा घेऊन सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे जिल्हा समन्वयक तथा संघटक श्री सिद्धार्थ थोरात आणि त्यांच्या पत्नी आतीक्षा थोरात यांचा सावित्री फुले यांची प्रतिमा देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.कारण महाराष्ट्र राज्यातील जिल्हा समन्वयकांनी नुकताच सीटू कामगार संघटनेत प्रवेश केला आणि त्यांच्यावर कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. तसेच शहरी आरोग्य अभियानाचे समन्वयक सुहास सोनुले, लेखा व्यवस्थापक लखन सर, शहरातील नवीन नियुक्त गट प्रवर्तक सोनाली शिंदे,तालुका समूहक चौधरी आणि नवनियुक्त सर्व आशांचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय आरोग्य अभियानात ग्रामीण आणि शहरी भागात कार्य करणाऱ्या आशा ह्या सीटू संलग्न आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या सभासद आहेत. त्यांना सुरवातीला दीडसे रुपये दर महा मानधन मिळत होते. परंतु सीटू कामगार संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि लक्षवेधी आंदोलनामुळे आज घडीला साधारणतः पंधरा हजार रुपये दरमहा मानधन स्वरूपात पगार पडतो.
हा लढा लढत असताना फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार आणि सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांच्यावर विविध पोलीस स्थानकात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असून जिल्हा न्यायालयात खटले चालू आहेत. या सदर्भात देखील चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आशा व गट प्रवर्तकांना किमानवेतन दरमहा २६ हजार पाचशे रुपये देण्यात यावेत.ह्या प्रमुख मागण्यासह इतरही मागण्यासंदर्भात चर्चा झाली. माता सावित्री फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली.
यावेळी आशा व गट प्रवर्तक फेडरेशनचे सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी प्रास्ताविका मध्ये सखोल मार्गदर्शन केले आणि सरकारवर कठोर शब्दात ताशेरे ओढले.यावेळी राज्य उपाध्यक्षा कॉ.शिला ठाकूर, सिद्धार्थ थोरात,सुहास सोनुले, उदघाटन शहर समन्वयक सुहास सोनुले यांनी केले. सूत्रसंचालन कॉ. करवंदा गायकवाड केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ.लता गायकवाड, कॉ.मारोती केंद्रे, कॉ. मोहम्मद रफिक पाशा, कॉ. शरद रणवीर आदींनी परिश्रम घेतले.