महाशीवरात्रीच्या मध्यरात्रीला श्री परमेश्वराचा अलंकार सोहळा थाटात संपन्न

हिमायतनगर, अनिल मादसवार| संबंध भारतात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या मध्यरात्रीला वाढोण्याचे आराध्य दैवत देवाधिदेव महादेवाच्या रूपातील श्री परमेश्वर महाराजाचा अलंकार सोहळा तहसीलदार सौ.पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. तत्पूर्वी शासकीय महापूजा पुरोहिताच्या मंत्रोचार वाणीत विधिवत संपन्न झाली. महाशिवरात्रीला मध्यरात्री १ वाजेपर्यंत लाखो भाविकांनी रांगेत श्रीचे दर्शन घेतले. अलंकार सोहळ्यानंतर ५ दिवस म्हणजे दहीहंडी काल्यापर्यंत भाविकांना अलंकारमय श्री परमेश्वराचे दर्शन घेता येणार आहे.
येथील श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री सप्ताहाला दि.७ मार्चपासून अखंड हरिनाम सप्ताह, विना पहारा, व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने सुरुवात झाली आहे. त्या निमित्ताने मंदिराचा कळस व मुख्य कमानीवर आकर्षक अशी विद्दुत रोषनाई करण्यात आली असून, महाशिवरात्रीला मध्यरात्री १ वाजल्या पासूनच मंदिरात हजारो भाविकांनी रांगा लाऊन हरिहर रूपातील श्री परमेश्वर म्हणजे भोळ्या शंकराचे दर्शन घेतले. यावेळी शिव – पावर्तीचा मुख्य अभीषेक सोहळा माहूर येथून आलेल्या मानकऱ्यांच्या हस्ते संपन्न झाला. यंदा मुंबई येथून नव्याने आणण्यात आलेल्या ०१ कोटीच्या खर्चातील सुवर्णालंकाराने श्री परमेश्वर मूर्तीला सजविण्यात आले असून, यामुळे मूर्तीचे सौंदर्य अधिक खुलले होते.
मध्यरात्रीला पुरोहीत कांतागुरु वाळके, साईनाथ बडवे, परमेश्वर बडवे यांच्यासह पाच ब्राम्हण गुरुंच्या वेदशास्त्रींय मंत्रोच्चारात श्रीचा अभीषेक सोहळा व शासकीय महापुजा तहसीलदार सौ.पल्लवी टेमकर यांनी सह्पती केली. यावेळी ओम नमः शिवाय…. सांब सदाशिव… हर हर महादेवाच्या नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता. मध्यरात्री 3 वाजता संचालक मंडळांच्या उपस्थितीत अलंकार सोहळा थाटात संपन्न झाला. या अलंकाराने विभुषीत केलेल्या श्री परमेश्वर मूर्तीचे दर्शन भाविक भक्तांना दहीहांडी गोपाल काल्यापर्यंन्त घेता येणार आहे. या सगून रूपात श्री परमेश्वराची मुर्ती पाहुन भावीक भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटणार आहेत. दरम्यान अलंकारमय मूर्तीच्या संरक्षणासाठी बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात आला आहे.
दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीने शहरातील भाविकांनी श्री परमेश्वर दर्शनासाठी भगवा ध्वज आणि पुरण पोळीचा नैवैद्य ढोल ताश्याच्या गजरात आणून परमेश्वराला अर्पण करून श्री दर्शन घेऊन पारण्याचा उपवास सोडला. यावेळी मंदिर परिसरात शेकडो भगव्या ध्वजाने मंदिर परिसर भगवेमय झाले होते. यावेळी अलंकारमय श्री परमेश्वर दर्शनासाठी मंदिरात भाविकांची रांग लागली होती. आता खऱ्या अर्थाने हिमायतनगर येथील महाशिवरात्री यात्रेला रंगात येऊ लागली असून, आगामी १५ दिवसाच्या यात्रा पर्व काळात विविध धार्मिक, सामाजिक, संस्कृती कार्यक्रमांची रेलचेल चालणार आहे.
