नांदेड| कलर्स मराठी या वाहिनीवर रोज सायंकाळी सात वाजता प्रदर्शित होणारी मालिका सिंधुताई माझी माई मध्ये नांदेडचे श्रीनगर येथील रहिवासी कुणाल गजभारे हे या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत…
या मालिकेमध्ये कुणालने सिंधुताईंच्या मोठ्या दिराची भूमिका साकारत सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या, नांदेड जिल्ह्याची शान वाढवली आहे. मोतीलाल नावाचं कुणालचं पात्र मालिकेमध्ये विलनच्या रूपात आपल्याला दिसत आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात त्याचं अढळ स्थान निर्माण करत आहे. मोतीलाल बद्दल बोलायचं झालं तर मोतीलाल हा सिंधूताईंच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा व्यक्ती होता जो की त्यांचा मोठा दिर ज्याच्या त्रासामुळे सिंधुताईंना घर सोडावे लागले.. या मालिकेतील पात्र म्हणून पाहायला गेलं तर मोतीलालच हे पात्र कुणाल साठी अतिशय आव्हानात्मक आणि महत्वपूर्ण पात्र आहे आणि ते तो सक्षमपणे साकारत आहे.
त्याचं रुबाबदार शरीर आणि रुबाबदार अभिनय या पात्रास साजेसा आहे..कुणाल गजभारे याने यापूर्वी माझे मन तुझे झाले, सुख म्हणजे नक्की काय असतं, लक्ष, कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकांमध्ये तसेच डॉ. प्रकाश बाबा आमटे, यशवंतराव चव्हाण, आशियाना, बे दुणे पाच, आता माझी सटकली, फ्रेंडशिप डॉट कॉम, हलाल, पाणी, व्हि.आय.पी. गाढव, अंकुश या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. कुणालने मुंबई विद्यापीठातून नाट्यशास्त्र विषयामध्ये एम. ए. केले आहे. तो नांदेडच्या प्रतिभा निकेतन शाळेचा विद्यार्थी असून त्याचे बी.ए. पर्यंतचे शिक्षण यशवंत महाविद्यालय नांदेड येथे झाले आहे.
या मालिकेत मिळालेली सुवर्ण संधी- कुणाल गजभारे
सिंधुताई माझी माई या मालिकेबद्दल बोलताना कुणाल म्हणतो की, ही मालिका माझ्या आयुष्यातील मला मिळालेल्या सुवर्णसंधींपैकी एक आहे. जी कलाक्षेत्रातील माझं नाव नक्कीच एका वेगळ्या उंचीवर नेईल. विशेष म्हणजे मला या गोष्टीचा आनंद वाटतो की ही मालिका एक परिवर्तनवादी मालिका असून सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनातील संघर्ष सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवते आणि सर्वसामान्य स्त्री देखील तिच्या शिक्षणाने, स्वाभिमानाने, जिद्दीने या देशात परिवर्तन आणू शकते, हा संदेश देते. सिंधुताईंनी अनाथांसाठी केलेले कार्य सर्वांनाच माहित आहे आणि ते शब्दात सांगणे कठीणच. अशा या वास्तववादी मालिकेत मला भूमिका साकारण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो.पुढे बोलताना कुणाल म्हणाला, माझी सहा वर्षाची मुलगी गझल आणि नऊ वर्षाची मुलगी सुफी ही मालिका पाहून मला म्हणतात की, पप्पा मला सुद्धा चिंधीसारखं म्हणजे सिंधुताई सारखं बनायचंय. यातच या मालिकेचं यश आहे असं मला वाटतं. या मालिकेतून प्रेरणा घेऊन सिंधुताई सारख्या अनेक सिंधू उदयास याव्यात अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली. कुणाल गजभारे यांच्या यशाचा शिखर असाच उंचावत राहो, संपूर्ण महाराष्ट्राचे, नांदेडचे त्यांच्या परिवाराचे नाव त्यांच्याकडून मोठे होवो हीच अपेक्षा प्रेक्षकांकडून आहे.