नांदेड| बाद फेरीत चमकदार प्रदर्षन करीत विजय मिळविणा-या नागपूर विद्यापीठासह, पुणे, ग्वाल्हेर व हनुमानगढ विद्यापीठाने उपात्यंपूर्ण सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर मात करीत साखळी फेरी गाठत अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी आपली पात्रता पक्की केली आहे.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने सुरु असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेतील बाद फेरीतील सामने अटीतटीचे झाले. उपांत्यपूर्व सामन्यात रविवारी एलएनआयपीई ग्वाल्हेर विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३-० ने सरळ पराभव केला. आरटीएमयू नागपूर विद्यापीठाने राजस्थान विद्यापीठाचा २५-२३, २५-१४, २५-१५ असा सरळ तीनसेट मध्ये पराभव केला. एसकेयू हनुमानगढ विद्यापीठाने मेवाड विद्यापीठाचा ३-० ने एकतर्फी धुव्वा उडविला. चौथ्या सामन्यात पुणेच्या भारती विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाचा २५-१८, २५-२०, २५-१० असा सरळ तीन सेटमध्ये पराभव करीत साखळी फेरी गाठली आहे. तत्पूर्वी यजमान नांदेड संघाला मात्र अटीतटीच्या सामन्यात मेवाड विद्यापीठाकडून ३-२ असा पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे यजमान संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. दुस-या सामन्यात नागपूर विद्यापीठाने सिकर विद्यापीठाचा अटीतटीच्या लढतीत ३-२ असा पराभव केला. ग्वाल्हेर विद्यापीठाने कोल्हापूर विद्यापीठाचा सरळ तीन सेट मध्ये पराभव केला. मुंबई विद्यापीठाने सातारा विद्यापीठाचा अटीतटीच्या लढतील ३-२ ने पराभव केला.
या स्पर्धा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. माधूरी देशपांडे, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, प्रभारी क्रीडा संचालक, डॉ. मनोज रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा समन्वयक तथा आयोजन समिती सदस्य अंकुश पाटील, डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. विक्रम कुटूंरवार, डॉ. अशोक कदम, डॉ. गंगाधर तोगरे, डॉ. सचिन चामले, डॉ. महेश पाळणे, तांत्रिक समितीचे सदस्य विक्रम पाटील, सुधीर दापके, सचिन पाळणे, विजय उपलंचवार, डॉ. दिलिप भडके, डॉ. दिलिप माने, डॉ. गोविंद कलवले, डॉ. सुभाष देठे, पांडूरंग पांचाळ, डॉ. तातेराव केंद्रे, पंच प्रमुख पी.एस. पंत, अनिल गिराम, सौरभ रोकडे, प्रकाश मस्के, विठ्ठल कवरे, सुनिल मुनाळे, मं. कासीम, अमित करपे, निखिल भगत, शाहबाज पठाण यांच्यासह विविध समितीमधील सदस्य परिश्रम घेत आहेत.
खेळाडूंना प्रोत्साहनपर बक्षिस……
स्पर्धे दरम्यान प्रो-व्हॉलीबॉल लिग मधील मुंबई मेन्टॉर्स् संघातर्फे खेळाडूंना काही लक्ष देण्यात आले. यातील विजेत्या खेळाडूंना टी-शर्ट देण्यात आले. यासह पंच, स्वयंसेवक यांनाही टी-शर्ट व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यामुळे खेळाडूंना स्पर्धेदरम्यान प्रोत्साहन मिळाले.
आज बक्षिस वितरण….
सोमवार दि. १८ डिसेंबर रोजी सकाळ व सायंकाळच्या सत्रात विद्यापीठातील इनडोअर हॉल मध्ये साखळी स्पर्धेतील सामने रंगणार आहेत. यातील विजेत्या संघाला चषक देवून गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. माधूरी देशपांडे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते राजकुमार दहीहंडे, स्पर्धा निरीक्षक राजेश कुमार डाका, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, प्र. क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांची उपस्थिती राहणार आहे