नांदेड| संगीत ही विश्वमानवाची आदिम भाषा आहे. ती प्राचीन आहे आणि प्रेमळही आहे. विविध राष्ट्रे, खंड, धर्म, पंथ, विचारसरणी असणाऱ्या मानसांना एकत्र बांधण्याचे कसब संगीताच्या ठाई आहे, असे उद्गार पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर यांनी काढले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवि कला संकुल, भाषा वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुल आणि माध्यमशास्त्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वसुधैव कुटुंबकम: कला, साहित्य व माध्यम’ या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बिज वक्तव्य गुंफताना पद्मश्री पंडित तळवणकर बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे होते. पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, डॉ. विकास सुकाळे, डॉ. दीपक पानसकर, डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. रमेश ढगे, डॉ. राजेंद्र गोणारकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
‘अवघे जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असताना संगीत व अन्य कला मानवाला शांततेच्या मार्गाने घेऊन जाऊ शकतात. संगीतात बिभित्स राग नसतो. संगीताचा लय-ताल निर्माण करणारे हात बंदूक धरू शकत नाहीत. युद्धाची भाषा करत नाहीत.’ असेही पद्मश्री पंडित तळवळकर म्हणाले.
उद्घाटक पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी झाडीपट्टी रंगभूमीच्या योगदानाची माणूस जोडणारी मांडणी केली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ हाच जीवनाचा मूलमंत्र असून वर्तमानात त्याची आवश्यकता आहे. असे सांगितले. चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले. प्रस्ताविक डॉ. रमेश ढगे यांनी केले तर राजेंद्र गोणारकर यांनी आभार मानले. डॉ. अनुजा जोशी-पत्की यांच्या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
उद्घाटनानंतरच्या सत्रात पंडित तळवळकर, डॉ. परशुराम खुणे, डॉ. गणेश चंदनशिवे आणि डॉ. गणेश तरतरे यांनी ललित, संगीत, नाटक, लोकसंकृती व चित्रकलेतून व्यक्त होणाऱ्या विश्वकुटुंबाच्या प्रतिमांची मांडणी केली तर दुपारच्या सत्रात डॉ. ओकेदिरान वले (नायजेरिया) यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अश्रफ याझिद दाली (इजिप्त), डॉ. जाहरोझ जफ्ता (दक्षिण अफ्रीका), डॉ. भिमराव भोसले (हैद्राबाद) यांनी मांडणी केली.
डॉ. महेश जोशी, डॉ. सचिन नरंगले, डॉ. अनुराधा जोशी-पत्की, किरण सावंत यांनी विविध सत्राचे सूत्रसंचालन केले. चर्चासत्रास डॉ. दिपक शिंदे, डॉ. अशोक कदम, अधिसभा सदस्य डॉ. बी.एस. सुरवसे, डॉ. सरिता यन्नावार, डॉ. पंडित शिंदे, डॉ. संतोष हंकारे यांच्यासह संगीत, साहित्य, नाट्य क्षेत्रातील मान्यवर व देशभरातून आलेले अभ्यासक उपस्थित होते.