नांदेड। स्वरतरंग प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा वै. लक्ष्मीबाई पुराणिक स्मृती पुरस्कार, सौ. वर्धिनी जोशी हयातनगरकर यांना घोषित करण्यात आल्याची माहिती सौ. गीता व गोविंद पुराणिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या युवतींना, दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सौ. वर्धिनी यांना हा पुरस्कार वर्ष २०२२ साठी देण्यात येत आहे. यापूर्वीच्या या पुरस्काराच्या मानकरी, अंकिता जोशी, अश्विनी आडे जोशी, सारिका पांडे या आहेत.
दि. ६ ऑक्टोबर रोजी गिरीराज मंगल कार्यालय नांदेड येथे एका विशेष सांगीतिक मैफिलीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या विशेष समारंभात हा पुरस्कार सौ. वर्धिनी यांचे गुरू पं. टी. एम. देशमुख, संजय जोशी, सौ. मंजुषा देशपांडे व सौ. प्रणाली देशमुख यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
सौ.वर्धिनी जोशी हयातनगरकर यांनी सुरुवातीला पं.टी.एम.देशमुख यांच्याकडे व त्यानंतर पुण्याच्या सौ.पल्लवी पोटे यांच्याकडे आपले संगीत शिक्षण घेतले. एम.ए.संगीत व संगीत विशारद असलेल्या सौ.वर्धिनी जोशी हयातनगरकर यांनी प्रायोगिक पध्दतीने विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण देण्याचा उपक्रम पुण्यात सुरु केला असून, त्यांनी स्वतःचे म्युझिक अकॅडमी सुरु केली आहे.
सध्या पोतदार इंटरनॅशनल स्कूल पुणे येथे त्या संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. नांदेड व मराठवाड्यातील विविध भागात त्यांनी वेगवेगळ्या सांगितिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. सैनिक हो तुमच्यासाठी, मराठी पाऊल पडते पुढे, गर्जतो मराठी, दिवाळी पहाट या कार्यक्रमात त्यांनी दुर्मिळ गाणी सादर केली आहेत. हा समारंभ सर्व संगीतप्रेमींसाठी खुला असणार आहे. सर्व संगीतप्रेमींनी या समारंभात आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन स्वरतरंग प्रतिष्ठानच्या वतीने गिरीश देशमुख यांनी केले आहे.