नांदेड| राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘मी जिजाऊ बोलतेय’ ही एकांकिका सादर करुन जिजाऊंच्या वेषातील मुलींनी उपस्थितांची मने जिंकली. यात जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या वैभवी शिखरे, तेजल शिखरे, अक्षरा शिंदे आणि ज्ञानेश्वरी शिखरे या विद्यार्थिनींनी जिजाऊंच्या वेषात आपापल्या एकांकिकेचे सादरीकरण केले. यावेळी सरपंच प्रतिनिधी साहेबराव शिखरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशनराव गच्चे, मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष घटकार, आकाशवाणी नांदेडचे प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले, हरिदास पांचाळ, पांडुरंग गच्चे, हैदर शेख, ग्रा. प. कर्मचारी मारोती चक्रधर, शिक्षक मित्र कविता केशव गोडबोले, गोविंद शिखरे, निवृत्ती शिखरे, गोवंदे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब तसेच स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आणि ग्राम पंचायत कार्यालयातही जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रतिमांचे पुष्प व धूप पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे म्हणाले की, मराठी स्वराज्याची जननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांच्या माध्यमातून मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. मराठी माणसाचे स्वराज्य निर्माण केले आणि त्याला योग्य आकार दिला. रयतेला सुखी केले. एका नव्या शिवयुगाची निर्मिती केली. तसेच आकाशवाणीचे निवेदक आनंद गोडबोले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून गावातील भुमीपुत्र अजय किशनराव गोडबोले यांची भारतीय नौदलात निवड झाल्याबद्दल ग्राम पंचायत कार्यालय आणि शाळेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अजय गोडबोले यांनी सांगितले की, मला सुरुवातीला भारतीय नौदलाविषयी काहीही माहिती नव्हती. पण जेव्हा संपूर्ण माहिती घेतली तेव्हा त्याग आणि समर्पणाच्या भावनेतून भारतीय नौदलात भरती व्हायचा निर्णय घेतला. या माध्यमातून मला देशसेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे मत अजय गोडबोले यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप किशन गच्चे यांनी केला. सूत्रसंचालन कविता गोडबोले यांनी तर आभार संतोष घटकार यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.