
नांदेड| राज्य शासनाने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण नुकतेच लागू केले आहे, तरी परंतु काही समाज बांधव त्यावर फारसे समाधानी असल्याचे दिसून येत नाहीत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची नुकतीच प्रत्यक्ष भेट घेवून मी यासंदर्भात चर्चा केली आहे. तसेच देशातील आगामी काळ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच असल्याने त्यांच्या समोर हा प्रश्न कायदेशीरदृष्ट्या सोडविण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे, याचबरोबर सद्याच्या स्थितीत अतिशय ज्वलंत बनलेला हा प्रश्न संसदेच्या सर्वोच्च सभागृहात लावून धरून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तेंव्हापासून नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची भाजपात प्रवेश करण्यासाठी जणू रिघच लागली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाचे काही सेल आणि विविध ठिकाणच्या सर्कलमधील काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा भाजपमध्ये प्रवेश सोहळा अतिशय उत्साहात पार पडतो आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील मुगट सर्कलमधील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून आज बुधवारी ( दि.२७ ) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मगनपुरा येथील प्रगती महिला मंडळ येथे आज बुधवार दि.२७ मार्च रोजी दुपारी ११.३० वाजता अतिशय उत्साहात पार पडलेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्याला नांदेड लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार खा.प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी जि.प. सदस्या डॉ. मिनलताई खतगावकर, माजी जि.प.सदस्य रोहिदास जाधव, भिमराव पाटील कल्याणे, मारोतराव पाटिल शंखतीर्थकर, माधवराव पाटील, मारोतराव जाधव, सरपंच संतोष गाढे पाटील, धोंडीबा पाटील कल्याणे, शत्रुघ्न पा.गंड्रस, मुकु देशमुख, लोकडोजी गोणेवार, नामदेव पवार आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
एकाएकी पक्षांतर करणे म्हणावी तेवढी सहज सोपी बाब नाही, तरीही केवळ ‘ साहेब तुम्ही जिकडे, तिकडे आम्ही ‘ असे घोषवाक्य देत माझ्यावर विश्वास ठेवून दररोज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण भाजपमध्ये जाहीर प्रवेश करीत आहात, त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो, असे नमूद करून माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, देशातील आगामी काळ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचा आहे, त्यामध्ये आपण आता सहभागी झालो नाही तर, आपला भाग अविकसित म्हणजेच मागासलेला असेल. म्हणून नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाणे आवश्यक होते, कारण सत्तेशिवाय विकासाचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत,’ अबकी बार..४०० पार ‘, चा नारा देत केंद्रात पुन्हा बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाने चंग बांधला आहे. तसेच राम मंदिरामुळे प्रत्येक गावागावात अतिशय उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. त्यामध्ये आपणा सर्वांना सहभागी होवुन प्रामाणिकपणे काम करायचे आहे, जो विश्वास तुम्ही माझ्यावर दर्शविलात, त्या विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही, मागील प्रमाणे याही वेळी आपणास एकोप्याने ही निवडणुक लढवून जिंकायची आहे. त्यामुळे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन देखील माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांनी यावेळी केले आहे.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना माजी जि.प.सदस्य रोहिदास जाधव,भिमराव पाटील कल्याणे यांनी माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण साहेब यांच्यामुळेच आमची खरी राजकीय ओळख आहे. आपल्या भागाच्या विकासासाठी साहेबांनी सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत, भाजपमध्ये आजचा हा आमचा औपचारिक प्रवेश असला तरी ज्या दिवशी साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने मनाने आम्ही तेव्हाच भाजपात सामील झालो आहोत, तसेच अशोकराव साहेब हेच आमचे पक्ष, निशाणी आणि नेते असल्यामुळे यापुढे आम्ही मरेपर्यंतही साहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम करीत राहणार, असा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यानंतर मुदखेड तालुक्यातील मुगट सर्कलमधील कामळज, महाटी, आमदुरा माळकौठा, चिकाळा तांडा, गोपाळवाडी,गोपाळवाडी तांडा, वर्ताळा तांडा, रोही पिंपळगाव वाडी मुखत्यार आदि गावातील हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांनी भाजपचे उपरणे पांघरून त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारोतराव पाटील शंखतीर्थकर यांनी केले तर शेवटी नागोराव पाटील खानसोळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
अशोकराव चव्हाण यांच्यामुळे माझ्या मताधिक्याची चर्चा – खा. चिखलीकर
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि मी मागील निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलो, अगदी काही दिवस अगोदर पर्यंत कोणाच्याही ध्यानी मनी नसताना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपेने आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत, यापूर्वी आमच्यामध्ये हेवेदावे आणि मतभेद असले तरी आमच्यात कधीही वैयक्तिक मनभेद मात्र कधीच नव्हते,आतापर्यंतची आमची भूमिका पक्षीय होती, अशोकराव चव्हाण हे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायचे तर मी माझ्या पक्षाची. परंतु आता आम्ही दोघेही एकत्रित आल्यामुळे ही निवडणुक एवढी सहज सोपी झाली आहे की, अशोकराव चव्हाण साहेब यांच्यामुळे आता माझ्या लीडचीच ( मताधिक्याची) चर्चा होत आहे. दरम्यान ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असल्याने त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मतदानरुपी भरभरून आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
