काबरानगरातील श्रीकृष्ण मंदिरात व्याख्यानमालेचे पर्व, चार दिवस झालेल्या व्याख्यानमालेत विविध मान्यवरांची व्याख्याने
नांदेड| नांदेडच्या श्रीकृष्ण मंदिरात वैचारिक मंथन करण्यासाठी व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली असून, २६ ते २९ जानेवारीपर्यंत विविध मान्यवरांची व्याख्याने यात आयोजित करण्यात आली होती.
सध्याच्या धावपळीच्या काळात, आत्मकेंद्री होत चाललेल्या जगात मूल्यांची रूजवणी करण्याची, लोकांना विचारप्रवृत्त करण्याची, सजग समाज उभारणीची गरज लक्षात घेऊन काबरानगर भूषण शंकर परकंठे यांच्या संकल्पनेतून विश्वस्त मंडळाने सांस्कृतिक मंचाची स्थापना केली. विविध सांस्कृतिक, सामाजिक विषयांवर विविध तज्ञ व्याख्यात्यांचे दर महिन्यात व्याख्यानमालेचे आयोजन या मंचाने मागील महिन्यापासून सुरू केले ज्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मागील महिन्यात २७ ते २९ डिसेंबर ह.भ.प. विक्रम नांदेडकर यांचे महाभारतः एक चिरंतन दीपस्तंभ या व्याख्यानमालेला उदंड प्रतिसाद मिळाला.
यावर्षाची सुरूवात अवघ्या भारतात राममय वातावरणात झाली. भारतीयांची अस्मिता, आस्था, मनोबल यांची पूनर्प्रतिष्ठापणा अयोध्येतील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेने झाली. या अनुषंगाने काबरानगर सांस्कृतिक मंचाने २६ ते २९ जानेवारी अशी चार दिवस व्याख्यानाची मेजवानी दिली. परभणी येथील राष्ट्रीय व्याख्याते ह.भ.प. अविनाश गोहाड यांच्या रामनामः एक चिंतन या प्रभावी व्याख्यानाने मालीकेला सुरूवात झाली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अॅड. महेश कनकदंडे, अॅड. रेनापुरकर, श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. विवेक साले, सचिव रणजीत धर्मापुरीकर हे उपस्थित होते.
काबरानगरातील चिमुकली मुक्ताई नाईकने श्रीराम गीत गायले. तिला तबल्यावर साथ तिचा भाऊ चि. श्लोक नाईक याने दिली. डॉ. भाग्यश्री चिमकोडकर यांनी पहिले तीनही दिवस बहारदार शैलीत सूत्रसंचलन केले. २७-२८ दोन दिवस गोविंद पुराणिक यांनी रामायणः वास्तव दर्शन याविषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. २७ ला प्रमुख पाहुण्या सौ. वैशाली मिलिंद देशमुख, सहसचिव प्रफुल जुनगडे व सौ. संध्या जुनगडे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. सौ. आश्विनी आडे व सौ. पुराणिक यांनी शारदा स्तवन व शेवटी पसायदान सादर केले.
२८ ला लेखक, व्याख्याते डॉ. दीपक कासराळीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. व्यासपीठावर अध्यक्ष साले, सचिव धर्मापुरीकर आणि कोषाध्यक्ष श्रीपाद नाईक पाहुणे आणि वत्तäयांसह होते. अनन्या व गीत जोशी यांनी गणपती स्तुती व पसायदान सादर केले. २९ जानेवारीला देगलुरच्या धुंडा महाराज देगलूरकर कॉलेजच्या प्रा. डॉ. संजीवनी देशमुख यांनी रामायणः मानवी सभ्यतेचा आदर्श हा महत्वपूर्ण विषय प्रभावीपणे मांडला.
यावेळी प्रमुख पाहुणे उमेश दिघे, सांस्कृतिक मंचाचे सभासद इंजि. सुमंत देशपांडे, ललिता काबरा व सौ. अमृता नाईक व्यासपीठावर उपस्थित होते. शंकर परकंठे यांनी खणखणीत आवाजात संचलन केले. परकंठे यांनी स्वागत गीत व पसायदान सादर केले. या व्याख्यानमालेला नांदेडमधील काबरानगरसह विविध नगरातील श्रोत्यांनी तसेच विविध क्षेत्रातील अनेक ख्यातनाम मंडळींनी उपस्थिती लावली. काबरानगर विश्वस्त मंडळ, सांस्कृतिक मंचच्या सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्तीतेसाठी परिश्रम घेतले.