कोजागरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा)
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे. या दिवसाचे महत्त्व आणि पूजाविधी सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून समजून घेऊया.
तिथी : कोजागरी पौर्णिमा हा उत्सव आश्विन पौर्णिमा या तिथीला साजरा करतात.
इतिहास : या दिवशी भगवान श्रीकृष्णाने व्रजमंडळात रासोत्सव साजरा केला, असे श्रीमद्भागवतात म्हटले आहे.
महत्त्व : अ. वर्षातील या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. मूळ चंद्रतत्त्वाचे म्हणजे ‘चंद्रमा’चे प्रतिनिधित्व करणारा आणि आपल्याला दिसणारा चंद्र ‘चंद्रमा’प्रमाणेच शीतल आणि आल्हाददायक आहे. साधकांना चंद्रासारखी शीतलता ईश्वराच्या अवतारांपासून अनुभवता येते, म्हणूनच रामचंद्र, कृष्णचंद्र अशीही नावे राम-कृष्णांना दिली गेली. चंद्राच्या या गुणांमुळेच ‘नक्षत्राणामहं शशी’ म्हणजे ‘नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे’, असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत (10:21) सांगितले आहे.
आ. मध्यरात्री श्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येऊन ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागे आहे ?’, असे विचारून जो जागा असेल, त्याला धनधान्याने संतुष्ट करते. इ. या दिवशी ब्रह्मांडात आदिशक्ती रूपी धारणेतील श्री लक्ष्मी रुपी इच्छाशक्तीची स्पंदने कार्यरत असतात. या दिवशी धनसंचयाविषयी असलेल्या सकाम विचारधारणा पूर्णत्वाला जातात. या धारणेच्या स्पर्शाने स्थूलदेह, तसेच मनोदेह यांची शुद्धी होण्यास साहाय्य होऊन मनाला प्रसन्नधारणा प्राप्त होते. या दिवशी कार्याला विशेष असे धनसंचयात्मक कार्यकारी बल प्राप्त होते. ई. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ, म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हटले जाते.
उत्सव साजरा करण्याची पद्धत : ‘या दिवशी नवान्न (नवीन पिकवलेल्या धान्याने) जेवण करतात. श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा करतात. पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी देव आणि पितर यांना समर्पून नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात आणि मग आपल्याकडे आलेल्या सर्वांना देतात. शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करतात. चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची आयुर्वेदिक शक्ती आहे. त्यामुळे हे दूध आरोग्यदायी आहे. या रात्री जागरण करतात. करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ खेळतात. दुसर्या दिवशी सकाळी पूजेचे पारणे करतात.
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आणि इंद्र यांचे पूजन करण्याची कारणे :अ. या दोन देवतांना पृथ्वीवर तत्त्वरूपाने अवतरण्यासाठी चंद्र आग्रहात्मक आवाहन करतो. आ. लक्ष्मी ही आल्हाददायक आणि इंद्र ही शीतलतादायक देवता आहे. यादिवशी वातावरणात या दोन देवता तत्त्वरूपाने येत असल्याने आणि त्यांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने त्यांची पूजा केली जाते.
लक्ष्मी आणि इंद्र यांचा पूजाविधी :अ. लक्ष्मी आणि इंद्र यांच्या पूजेत पोहे आणि नारळाचे पाणी वापरतात. पोहे हे आनंद देणारे, तर नारळाचे पाणी हे शीतलता प्रदान करणारे आहे. त्यामुळे हे दोन घटक वापरून जीव स्वतःकडे आनंद आणि शीतलता यांच्या लहरी आकर्षित करत असतो. आ. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात; कारण या दिवशी दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहिल्याने त्यातून प्रक्षेपित होणारे चंद्रतत्त्व आपल्याला मिळते. या दुधात स्थूल आणि सूक्ष्म रूपांतून चंद्राचे रूप अन् तत्त्व आकर्षित झालेले असते.
इ. जागरण : मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येते आणि जो जागा असेल, त्याच्यावर संतुष्ट होऊन त्याला कृपाशीर्वाद देऊन जाते. त्यामुळे कोजागरीच्या रात्री जागरण केले जाते.
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
संकलन- श्री. दत्तात्रेय वाघूळदे, सनातन संस्था, संपर्क- 9284027180