बालाजी मंदिरात कार्तिक स्वामी दर्शन समर्पण तयारी.. २६ रोजी दर्शनाचा योग
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील पुरातन कालीन भगवान बालाजी मंदिरात असलेल्या श्री कार्तिक स्वामी (षडानंद) दर्शन समापन दिनानिमित्त मंदिर संचालकाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावर्षी कार्तिक शु.१४ रवीवार दि.२६ नोव्हेंबर रोजी कार्तिक पोर्णिमा कृतिका नक्षत्र दिनी तीन योग एकत्र आल्यामुळे सपत्निक कार्तिक स्वामी दर्शन घेत येईल अशी माहिती वेद शास्त्रीय संपन्न पुरोहित कांतागुरु वाळके यांनी दिली आहे. एरवी कार्तिक स्वामींचे दर्शन महिला घेता येत नाही, परंत्तू यंदा महिलांना देखील दर्शन घेण्याचा योग्य जुळून आला आहे.
हिमायतनगर शहर हे देवी – देवतांच्या मुर्त्यांचे शहर म्हणून सबंध महाराष्ट्रात ख्यातीप्राप्त आहे. हजारो वर्षापूर्वीच्या अखंड पाषाणातील दुर्मिळ मुर्त्या खोदकाम तथा बांधकामाच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. त्यातीलच एक मूर्ती म्हणजे (षडानंद) कार्तिक स्वामीची असून, कार्तिक पौर्णिमेनिमित्त दर्शनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सदर मूर्ती अत्यंत रेखीव व देखणी असून, नांदेड जिल्ह्यात हि एकमेव मूर्ती मोरावर आरूढ झालेली आहे. सदर मूर्ती दर्शनसाठी विदर्भ, तेलंगाना, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रातील दूर दूरवरून भाविक – भक्त दर्शनसाठी येतात.
या जन्मी विद्या बुद्धी, धन ऐश्वर्य, पुत्र – पोत्र संपदा समर्पनेने सुख समृद्धी आगता…पुढील जन्म चांगला मिळण्यासाठी श्री कार्तिक स्वामीच सर्वांनी दर्शन घ्यावे असे आव्हानही त्यांनी केले आहे. दि.२६ रोजी सकाळी ४ वाजता येथील बालाजी मंदिरात विराजमान असलेल्या भगवान कार्तिक स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक महापूजा संपन्न होऊन प्रसाद वितरण केला जाणार आहे. दि.२६ च्या दुपारी १५.५४ पासून ते दि. २७ सोमवारी दुपारी १३.३५ वाजेपर्यंत भक्तांना श्रीचे दर्शन घेण्याचा विशेष योग जुळून आला आहे.
” कार्तिक स्वामी ” दर्शन विधी
यावर्षी कार्तिक शु.१४ रविवार दि.२६ नोव्हेंबर रोजी दुपारी १५.५४ पासून ते दि. २७ सोमवारी दुपारी १३.३५ वाजेपर्यंत पोर्णिमा व कृतिका नक्षत्र असल्याने या योगावर कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे. प्रथम स्नान करून कार्तिकेयाचे दर्शन घेवून दर्भ, चंदन, फुले, दशांगधूप, दीप अर्पण करून कार्तिकेयाचे वाहन मयुराची पूजा करावी. त्यानंतर पुढे दिलेले श्लोक म्हणून एक एक उपचार अर्पण करावा.