पत्रकारांनी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी निर्भिड, सत्यवचनी रहावे -विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर

नांदेड| जाणीवपुर्वक कोणी चुका करीत असेल तर आणि त्या समाजाच्या हितासाठी बाधक असतील तर पत्रकारांनी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी निर्भिड, सत्यवचनी राहून प्रभावी पत्रकारीता करावी असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी केले. महात्मा गांधी मिशन संचलित पत्रकारिता-माध्यमशास्त्र व व्हाईस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिन व प्राचार्य डॉ.गणेश जोशी यांनी संपादीत केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन दि.6 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महावरकर बोलत होते.
यावेळी प्रारंभी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शशिकांत महावरकर, नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, व्हाईस ऑफ मीडियाचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले, पत्रकार चारूदत्त चौधरी, भारत दाढेल, अनुराग पवळे, मारोती सवंडकर, शरद काटकर, जयपाल गायकवाड आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना विशेष पोलीस महानिरीक्षक महावरकर म्हणाले की, चार दिवस जगायचे की चाळीस दिवस जगायचे हे आपण ठरविले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी अर्धवट ज्ञानावर लिखान करू नये. पत्रकारांनी वैचारीक पातळी वाढवून सकारात्मक पत्रकारीता करावी. ज्या बातम्यातून समाजाचा विकास होतो अशाच बातम्याला प्राधान्य द्यावे. शासनाच्या योजना सर्वसामान्यां पर्यंत पोहोचवाव्यात. मीडिया ट्रायल म्हणजे एखाद्याला जाणीवपुर्वक अडचणीत आणणे हे चुकीचे आहे. समाज हितासाठी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निर्भिड आणि सत्यवचनी पत्रकारीता करावी असे आवाहनही महावरकर यांनी केले.
तर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी पत्रकारांना आव्हान नसून सोशल मीडिया, इतर साधनामुळे संधी उपलब्ध झालेली आहे. बिन पैशाचे व्यासपिठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कंटेन असलेली पत्रकारीता करावी असे त्यांनी सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी लोकशाहीमध्ये मोठ्या प्रमाणात माध्यमात मीडिया ट्रायल केले जात आहे ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे. न्यायालयाने मीडिया ट्रायल संदर्भात हस्तक्षेप करणे ही बाब पत्रकारांनी विचार करण्या सारखी आहे. त्यामुळे समाज हिताची पत्रकारीता करावी. पत्रकारांनी स्वतःच्या तब्यतेची काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.
जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी नवोदीत होऊ पाहत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रारंभी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, वैशिष्ट्यपुर्ण काम करण्यासाठी त्याची आखणी करणे आवश्यक आहे. पत्रकारितेमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी याला दिशा देण्याचे काम पत्रकारितेतून केले जाते. एखाद्या बातमीमुळे पुर्ण परिवर्तन होऊ शकते. त्यामुळे अधिक जागृक राहून अभ्यासपुर्ण पत्रकारिता करून लिखान करावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
तर प्रास्ताविकात महात्मा गांधी मिशन संचलित पत्रकारिता माध्यमशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश जोशी म्हणाले की, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाने आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडविले आहेत. शासनाच्या जनसंपर्क विभाग, टिव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंट मीडिया व आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी देशभरामध्ये नावलौकीक मिळविले आहे. अशा व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले संस्कार घडावे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. असे म्हणत त्यांनी वर्षभर राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. तसेच पत्रकार भारत दाढेल यांनी पत्रकारांशी आव्हाने बदलत गेले आहेत.
उपेक्षितांना न्याय देण्याचे काम माध्यमांचे असल्याची त्यांनी जाणीव करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून एमजीएम ग्रंथालय विभागाचे प्राचार्य डॉ.गोविंद हंबर्डे यांनी प्रसार माध्यमात जगभरात अनेकांनी आपले करीअर सुरू केले आहे. असे असतांना अनेक पत्रकारांची नोंदणी होत नाही. शासन स्तरावर प्रत्येक पत्रकारांची नोंदणी व्हायला हवी. प्रशिक्षीत पत्रकार असायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतिशय समर्पकपणे साहित्यीक, समिक्षक राम तरटे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले यांनी मानले.
या कार्यक्रमामध्ये दर्पण दिनानिमित्त पत्रकार पंढरीनाथ बोकारे, प्रशांत गवळे, सुरेश आंबटवार, कमलाकर बिरादार, सुरेश काशिदे, प्रदिप घुगे, कुवरचंद मंडले, प्रल्हाद कांबळे, यशपाल भोसले, दिपंकर बावसकर, अविनाश चमकुरे, डॉ.भगवान सुर्यवंशी, प्रल्हाद कांबळे, श्रीधर नागापुरकर, प्रविण कंधारे, नागोराव भांगे, रामराव भालेराव, संजय सुर्यवंशी, प्रा.शरद वाघमारे, शिवाजी शिंदे आदी पत्रकारांचा पुष्पगुच्छ व भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.प्रविणकुमार सेलुकर, प्रा.राज गायकवाड, हनमंत येनवळगे यांनी परिश्रम घेतले.
आद्य पत्रकार जांभेकर यांचा आदर्श घ्या, टार्गेट पत्रकारिता नको -पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे
समाजाचे मन परिवर्तन करण्याची क्षमता पत्रकारितेमध्ये आहे. अनेक वेळा चुकीची माहिती घेवून एखाद्याला टार्गेट केले जाते त्यामुळे तो व्यक्ती आयुष्यातून संपतो. त्यामुळे बातमीची सत्यता पडताळून पत्रकारिता करावी. विकासात्मक पत्रकारितेकडे पत्रकारांनी अधिक भर द्यावा. आपल्या बातमीमुळे कुणाला आंदोलन करण्याची संधी मिळेल हे चुकीचे असून स्वतःचे हित नसून समाजाचे हित जोपासले पाहिजे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून पत्रकारांनी पत्रकारिता करावी असे प्रतिपादन नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.
लोकतंत्र में माध्यम का सहयोग पुस्तकाचे प्रकाशन
महात्मा गांधी मिशन संचलित पत्रकारिता-माध्यमशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश जोशी यांनी लिहिलेल्या ‘लोकतंत्र में माध्यम का सहयोग’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
