नांदेड। रिपब्लिकन हक्क परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023 पत्रकार अनुराग पोवळे यांना जाहीर करण्यात आला आहे. रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश रामजी सोनाळे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त रिपब्लिकन हक्क परिषदेच्या वतीने दिनांक एक जानेवारी 2024 रोजी आयटीआय परिसरातील क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले पुतळ्यासमोर भीमा कोरेगाव शौर्य स्तंभास मानवंदना देण्यात येणार असून याच वेळी रिपब्लिकन हक्क परिषद पुरस्कार आणि रिपब्लिकन मित्र पुरस्कारही वितरित करण्यात येणार आहेत. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
यावर्षीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी दैनिक उद्याच्या मराठवाड्याचे पत्रकार अनुराग पोवळे यांची निवड करण्यात आली आहे. पोवळे हे दैनिक लोकमत मध्ये प्रदीर्घ काळापर्यंत उपसंपादक म्हणून कार्यरत होते. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पोवळे यांनी शोषित, पीडित , वंचितांच्या न्याय हक्कासाठी आपली लेखणी झिजवली आहे.एक जानेवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल अनुराग पोवळे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.