उंचाडा येथील जागृत देवस्थान : कालींका देवी
हदगाव। वारंगा -नागपुर या राज्य मार्गावर पाच किलोमीटर च्या अंतरावर हदगाव तालुक्यातील उंचाडा हे गाव कयाधु नदीच्या पवित्र काठावर स्थिरावलेले आहे.ही कयाधु नदी जणू या गावाची चंद्रभागाच आहे. तिच्या पाण्यावर हिरवेगार शिवार कुठल्याही मौसमात बागडत असतो. त्यामुळे या समृध्द गावातील सातशे -आठशे च्या चौकटी असलेली घरे चव्हाण या एकाच नाळाची आहेत.बाकी इतरही आडनावाची चौकटी आहेत परंतु ही असामी असल्या मुळे संख्या ही कमी आहे.
गावात सर्व जण नेहमी गुण्या गोंविदाने आपल्या शिवारात राबून , कष्ट करुन समाधानी जीवन जगणारे माणसं असल्या मुळे धार्मिक जास्त आहेत. नियमीत हरीपाठ , किर्तन गावात चालु असते. अस्सा गावाचे ग्रामदैवत जवळपास पंचक्रोशीत नसलेले व उंचाडा या गावात वसलेले अत्यंत पवित्र, प्राचीन देवस्थान म्हणजे कालींका देवी होय. कुठलेही, किती ही मोठे काम असले की , प्रत्येक जण कामाच्या आधी देवळात जाऊन माथा ठेवणार व त्या नंतरच कामाची सुरुवात करणार. असा हा पायंडा गावातील वयोवृद्ध ते तरुणां पर्यंत पाळत असतात. उंचाडा नगरीत कधीही वाद विवाद होत नाही आणि झालाच तर मग शेवटी म्हणतात ‘चल बरं… काळंका माईंच्या देवळात… खरं खोट करुता…’ झाल इथेच संपला वाद . जवळपास कुठल्याच गावात लांब पर्यंत देवीचे मंदिर नसल्यामुळे आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारी , कुणीही आर्शिवादासाठी हात पसरुन गेले त्या भक्तांना भरभरुन देणारी अशी कालींका देवीची ख्याती आहे.
यामुळे नवरात्री उत्सव व इतर उत्सव अत्यंत उत्साहाने प्रत्येक जण साजरा करत असतो.या साठी येणाऱ्या खर्चाला प्रत्येकाच्या दारात उभे राहण्याची आवश्यकता नाही तर सर्व भावीक भक्तच कालींका देवीच्या मंदिरात आपल्या उत्पन्ना नुसार , मोकळ्या मनाने दान करुन , मोठ्या प्रमाणावर श्रमदान ही करतात. या मुळे मंदिर परिसरात अस्वच्छता दिसुन येत नाही. कालींका देवीचे दर्शन घेऊन बाहेर आले की परिसर पाहून प्रसन्न वाटते. ही दान करण्याची, काम करण्याची परंपरा फार पुर्वी पासून चालत आलेली आहे. यात कुठेही भेदभाव, चढाओढ अजिबात दिसुन येत नाही. या मुळे प्रख्यात किर्तनकार ,साहित्यिक याच गावचे सू.ग.चव्हाण यांनी रचलेली कालींका देवीची आरती प्रसिद्ध आहे. कित्येकांना ही आरती मुकपाठ आहे.
उंचाड्यातील हे कालींका देवीचे मंदिर अत्यंत जुन्या काळातील असुन काही धार्मिक ग्रंथात ही याचा उल्लेख आढळतो.कालींका देवीच्या दोन्ही मुर्ती स्वयंभू असून मंदिराच्या प्रांगणात असलेल्या बारवा मधुन प्रगट झाल्याची आख्यायिका गावातील अनेक जुने, जाणकार मंडळी सांगतात.
पुर्वी देवीच्या मंदिराला दार लहान असल्याने आत वाकुन जावे लागत असे. भक्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात कधीही व कोणत्याही वेळी पाय ठेवला तर हलका ओलावा पायाला नेहमी लागत असे. अस्या ओल्या पायाने गाभाऱ्यात जळत असलेल्या नंदादीपाच्या मंद प्रकाशात कालींका देवीच्या तेजोमय, प्रसन्न मुर्तीचे दर्शन घेऊन आलेला माणूस समाधानी होऊन जातो. देवीच्या पायावर जो कोणी नतमस्तक होतो. त्याच्या सर्व इच्छापुर्ती नक्कीच पूर्ण झाल्या असल्यामुळे नवरात्रात लांबून भावीक येत असतात. . नवरात्र महोत्सवा मध्ये कालींका देवीच्या मंदिरात कधी ही नवीन मुर्ती आणुन स्थापना करत नाही व गावात ही इतर ठिकाणी करत नाहीत. मंदिरात घट स्थापना करुन नियमीत कालींका देवीची मनोभावे पूजा केली जाते.
दसऱ्याच्या दिवशी तर मोठ्या प्रमाणात साज – श्रृंगार करुन या वेळी देवीचे अत्यंत मोल्यवान दाग -दागिने अंगावर टाकलेले असतात. असे कालींका देवीचे वैभवशाली रुप पाहण्यासाठी , प्रत्यक्ष आपल्या डोळ्यात साठवून ठेवणाचा जो तो प्रयत्न करत प्रचंड गर्दी करत असतो. . या पावन उंचाडा नगरीत २०१७ या वर्षी सर्व ग्रामस्थानी मंदिराचे भव्य बांधकाम पूर्ण केले असून या मंदिराची उंची ३२ फुट आहे.या सर्व बांधकामा वर अत्यंत सुभक , कल्पक नक्षीकाम करण्यात आले आहे.उंचाड्यातील प्रत्येक गावकऱ्यांनी मंदिर बांधकामासाठी धन व श्रम दान दिले आहे.