
हिमायतनगर,दत्ता शिराणे। तालुक्यातील सरसम बु. ते करंजी अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नाल्यावरील सिमेंट पुलावरील सुरक्षा भिंती मध्यभागी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी युवक आढळला आहे. हि घटना बुधवार दि. १२ सकाळी 6 वाजता उघडकीस आली आहे. जखमींवर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून अधिक उपचारांसाठी नांदेड ला हलविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्ग रस्ता हिमायतनगर ते भोकर अंतर्गत सरसम ते करंजी दरम्यान असलेल्या नाल्यावरील सिमेंट पुलाच्या संरक्षण भिंतीच्या मध्यभागी कोणीतरी अज्ञाताने जिवे मारण्याच्या उद्देशाने पवना येथील युवक अशिष साईनाथ जाधव वय २८ वर्ष यास पाठीमागून येवून वार करून गंभीर जखमी केले. प्रचंड रक्त स्त्राव झाल्याने तो युवक मृत्यू पावला असल्याचे गृहीत धरून मारणाऱ्यानी तेथून पलायन केले. मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी असा अंदाज बांधला जात असून सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
या रस्त्यावरून मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरीकांस ही घटना जायमोक्यावर दिसून आल्याने पोलीस पाटील माधवराव नरवाडे यांना ही माहीती देण्यात आली. प्राप्त माहितीनुसार पोलीस पाटील नरवाडे यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याला सदर माहीती कळवीली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल भगत हे घटनास्थळी फौज फाट्यासह दाखल होवून पंचनामा केला. जायमोक्यावर हातोडी व दुचाकी क्र. एम. एच. ३८ क्यू ६७१५ ही गंभीर जखमीच्या शेजारी आढळून आली आहे.
गंभीर जखमीस ताब्यात घेऊन हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी त्यास नांदेडला पाठविण्यात आले असून वृत लिहीपर्यंत हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गंभीर जखमी युवकांवर नांदेड येथे उपचार सुरू असून पोलीस तपासाअंती या गुन्ह्याचे स्पष्टीकरण होणार असून हिमायतनगर पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
