क्रीडा

भारत २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी सज्ज – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई| ‘खेळ हे पदक जिंकण्यासाठी नसतात. तर खेळातून हृदय जिंकले जाते.खेळात जगाला जोडण्याची क्षमता असते असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत २०३६ मधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनासाठी सज्ज असल्याचे निःसंदिग्ध अशी ग्वाही दिली. त्यांनी २०२९ मध्ये होऊ घातलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनाची तयारी दर्शवली.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या अधिवेशनाचे पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय प्राचीनात्वाच्या खूणा आणि वैविध्यपूर्ण परंपरा आणि कला, नृत्य आणि संस्कृतींचा परिचय करून देणारा नजराणाच जगभरातील प्रतिनिधी समोर सादर करण्यात आला. या सादरीकरणाने बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर मधील ग्रँड थिएटर दुमदुमून गेले.

पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, भारत वेगाने वाटचाल करणारी अर्थव्यवस्था आहे. आमच्याकडे उत्तम पायाभूत सुविधा आहेत. गेल्या काही वर्षांत आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक क्रीडा स्पर्धांचे यशस्वीपणे संयोजन केले आहे. भारताला जी-२० चे अध्यक्षपद मिळाले. या काळात आम्ही भारतातील विविध शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. आता कोट्यवधी भारतीय जनतेला ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनाची संधी मिळावी अशी आस लागून राहिली आहे. आम्ही २०३६ मधील ऑलिम्पिकचे यशस्वीपणे संयोजन करू शकतो असा विश्वास आहे. या दरम्यान होऊ घातलेल्या २०२९ मधील युवा ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनाची देखील आमची तयारी आहे. भारतीयांच्या या आकांक्षेची, स्वप्नाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती दखल घेईल असा विश्वासही पंतप्रधान श्री. मोदी यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान श्री. मोदी यांनी भारतातील प्राचीन क्रीडा परंपरेचा देखील आढावा घेतला. ते म्हणाले, भारतातील गावागावांत विविध खेळांची परंपरा आहे. या गावात प्रत्येक सणाला वेगवेगळ्या खेळ खेळण्यांची प्रथा आहे. आमची क्रीडा परंपरा समृद्ध आहे. प्राचीन ग्रंथामध्ये ६४ विद्यांचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये अश्वारोहण, धनुर्विद्या, जलतरण आणि मल्लविद्या यांचा समावेश आहे. धनुर्वेद अशी स्वतंत्र संहिता आहे. कच्छ येथील उत्खननात धौलाविरा परिसरात पाच हजार वर्षांपूर्वीचे प्रेक्षागृह आढळले आहे. राक्षीगढी येथेही असे जुने अवशेष सापडले आहेत. खेळात कुणी हारणारा नसतो. तर खेळाडू हा विजेता आणि शेवटपर्यंत शिकणारा असतो याचा उल्लेख करून आणि भारत हा वसुधैव कुटुंबकम् ची संकल्पना मांडणारा देश असल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला.

भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांच्या क्रिकेट प्रेमाचा उल्लेख केला. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाने क्रिकेटचा ऑलिम्पिक मध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे आणि आम्ही त्याबाबत लवकरच सकारात्मक बातमी ऐकण्याची आशा करत आहोत असा आशावाद प्रकट केला. याचवेळी त्यांनी अहमदाबाद येथे झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत, भारतीय संघाचे अभिनंदन केले.

भारताला ४० वर्षांनंतर दुसऱ्यांदा तर मुंबईला पहिल्यांदाच या अधिवेशनाच्या संयोजनाची संधी मिळाली आहे. १५ ते १७ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत हे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्यासह जगभरातील ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षा पी. टी. उषा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य तथा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती नीता अंबानी उपस्थित तसेच रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यासह तसेच क्रीडा तसेच कला व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष श्री. बाख यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून खेळ आणि क्रीडा क्षेत्राच्या योगदानाबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, पॅरीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक २०२४ मध्ये शांती, सलोखा आणि संवाद यासाठी प्रयत्न करण्यासाठी जी -२० च्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे. यासाठी पंतप्रधान श्री. मोदी यांच्या पुढाकाराचे स्वागत करायला हवे’ श्री. बाख यांनी क्रीडा क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता – एआय च्या परिणामकारक वापराबाबतही मांडणी केली.

सुरवातीला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य तथा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती अंबानी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, ‘एक मुंबईकर म्हणून या अधिवेशनासाठी जगभरातील क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे ब्रीद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जी-२० च्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सहकार्याने भारतात मुलांसाठी शिक्षण आणि क्रीडा यांचा मेळ साधण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला. जगभरातील कोट्यवधी आणि भारतातील २ कोटीहून अधिक मुलांपर्यंत ऑलिम्पिक व्ह्यॅल्यु एज्युकेशन प्रोग्रॅमच्या माध्यमातून क्रीडा कौशल्य पोहचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, याच ठिकाणी १२ ते १४ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक संपन्न झाली.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!