मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कलंबर ( बू .) येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू
उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर बुद्रुक ता.लोहा येथे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे – पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून लोहा तालुक्यातील कलंबर बुद्रुक येथेही दि. ३० ऑक्टोबर पासून बेमुदत साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे .
या साखळी उपोषणाला काशिनाथ पाटील भोकरे, बालाजी पाटील सवराते , चंद्रकांत पाटील सोरगे हे साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत. ह्या साखळी उपोषणास बसण्या आगोदर गावातून रॅली काढून उपोषणास प्रारंभ केला . कलंबर बुद्रुक गावात राजकिय नेत्यांना गाव प्रवेश बंदी यापूर्वीच करण्यात आली आहे. मतदानावर देखिल बहिष्कार टाकण्यात आला आहे.
तसेच या साखळी उपोषणासाठी तहसीलदार लोहा,ग्रामविकास अधिकारी कलंबर बुद्रुक, सहाय्यक पोलीस निरीक्षक उस्माननगर यांना साखळी उपोषणासाठी निवेदन देण्यात आले आहे. सदर साखळी उपोषणास गावातील सर्व जाती धर्मातील बांधव उपस्थित राहून साखळी उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे. तरी
महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये सुरु असलेल्या उपोषण व साखळी उपोषणाची शासनाने दखल घेऊन मराठा समाजाचा ओ बी सी प्रवर्गात समावेश करून सुरु असलेले आमरण उपोषण तात्काळ सोडवावे ही मागणी होत आहे.