
नांदेड। शहरात शुक्रवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास आयकर विभागाने एकाचवेळी 6 ठिकाणी छापे टाकून खळबळ उडवून दिली आहे. यामध्ये शहरातील भंडारी फायनान्ससह भंडारी बंधूंच्या निवासस्थानी छापे टाकले असून, अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली करून देखील काहीजण शासनाचा आयकर भरण्यात कुचराई करत असून, अनेक फायनान्स कंपन्या आयकर विभागाच्या निशाण्यावर असल्याची माहिती पुढे आली आहे.
नांदेड शहरासह जिल्ह्यात खाजगी फायनान्स व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सर्वसामान्यांची आवश्यकता लक्षात घेत अनेक पटींनी व्याजदर आकारून कर्ज पुरवठा केला जातो आहे. या फायनान्स कंपनीचा व्याजदर एवढा मोठा आहे की, सर्वसामान्य नागरिकांना ते परवडतही नाही. सर्वसामान्य गरजुच्या खिशाला कात्री लावणाऱ्या आणि त्यांची लूटमार करणाऱ्या खाजगी सावकारांना आयकर विभागाने छापे टाकून केलेल्या कारवाईने मोठी चपराक दिली आहे.
नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसरात आज दि. १० मे रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मुंबई परवान्याच्या नव्या कोऱ्या वाहनातून ६० ते ७० अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात छापेमारीला सुरूवात केली. शिवाजीनगरस्थित भंडारी फायनान्स लि.चे दोन कार्यालये, कोठारी कॉम्प्लेक्समधील कार्यालय, आदिनाथ पतसंस्था आणि पारसनगर येथील संजय भंडारी व त्यांच्या भावाच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले. आयकर विभागाच्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, परभणी येथील पथकाने एकाचवेळी सहा ठिकाणी कारवाई केली. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, भंडारी फायनान्स, आदिनाथ अर्बन सोसायटी या पतसंस्थेतील आर्थिक कारभाराच्या देवाण-घेवाणीची चौकशी केली. तसेच कागदपत्रांचीही छाननी करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. भंडारी फायनान्सकडून खाजगी सावकारी करण्यात येते का…? या अनुषंगानेही तपास सुरू असल्याचे समजते. आयकर विभागाच्या विविध ठिकाणच्या पथकांकडून एकाचवेळी मोठी कारवाई करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आयकर विभागाने केलेली ही छापेमारी नांदेड जिल्ह्यातील पहिलीच छापेमारी असल्याचे समजते. मोठ्या आर्थिक उलाढाली करून शासनाचा आयकर बुडविणाऱ्या अनेक कंपन्या देखील आयकर विभागाच्या निशाण्यावर असल्याचे समजते.
नांदेडमध्ये शुक्रवारी आयकर विभागाच्या सहा जिल्ह्यांव्या टिमने छापेमारी केली. पुणे, नाशिक, नागपूर, परभणी, छत्रपती संभाजीनगरसह नांदेड येथील पथकांचा यात समावेश होता. कारवाईदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भल्या पहाटे झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
