वाशिममध्ये एका शेतकऱ्यानं चक्क आपल्या गाईचं डोहाळे जेवण कार्यक्रम थाटात केला
वाशिम| वाशिममध्ये एका शेतकऱ्यानं चक्क आपल्या गाईचं डोहाळे जेवण कार्यक्रम थाटामाटात साजरा केला आहे. या कार्यक्रमास सग्या सोयऱ्यासह गावकरी देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. हा विषय आता चर्चेचा बनला आहे.
हिंदू धर्मात गोमातेला अनन्यसाधारण महत्व आहे. गाईच्या अंगात 33 कोटी देवतांचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात बहुतेक शेतकरी हे आपल्या घरी गाईचे पालन पोषण करून तिला लक्ष्मी मानतात. यामुळे बहुतांश शेतकरी आपल्या घरी असलेल्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. असाच कांहींसा प्रकार वाशिमच्या निरखी कुटुंबियाने केला असल्याचे समोर आले आहे. यांनी चक्क गायीचे डोहाळे विधीचा कार्यक्रम आयोजित करून सग्या सोयऱ्यांना जेवणाचे निमंत्रण देखील दिले आहे.
वाशिमच्या देवपेठ भागात राहणाऱ्या निरखी कुटुंबाने पाळलेल्या गाईने दिलेल्या वासराला (पिल्लाला) घरच्या मंडळीने नंदनी नाव ठेवलं आहे. तीन वर्षांची लाडकी नंदनी गाय ही काही महिन्यांपूर्वी गर्भवती राहिली. याची आनंदवार्ता कुटुंबात कळताच कुटुंबियाने डोहाळे विधी करण्याचा निर्णय घेतला. घरासमोर गायीचे डोहाळे विधीसाठी मांडव घालून मोठ्या हर्षोल्लासात हा कार्यक्रम केला आहे. यामुळे अनेकांचे लक्ष याकार्यक्रमाकडे वेधले होते. गाईला पंच आरतीने ओवाळण्यात आले. महिलांनी तिला गोग्रास भरवला अन् ओटीपूजन केले. हा आठवणीतील क्षण कॅमेऱ्यात बंदीस्त करण्यात आले. देशी गाईबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या या अनोख्या डोहाळ जेवणाला आलेल्या लोकांमधून परिसरात चांगलीच चर्चा होते आहे.
जसे सात महिने पूर्ण झाल्यावर महिलेल्या ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जातो अगदी याचा पद्धतीने आपल्या गाईच्या डोहाळे जेवणाला मिष्टान्न म्हणून जिलबी आणि रसमालाई, पापड, भजे यासह पाणीपुरी यासह पंचपक्वान्न जेवण पाहुण्यांसाठी ठेवण्यात आलं होते. कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या बच्चे कंपनीसह नागरिकांनी नंदनी गाई सोबत सेल्फी ही घेतली. डोहाळ गाणी गायली गेली. फुलांची सजावट देखील करण्यात आली त्यानंतर गाईची ओटी महिलांनी भरली.