नांदेड।हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी १६ डिसेंबर रोजी हिंगोली येथील महावीर भवन आणि नांदेड येथील शिवमळ्यात स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात शिवसैनिक विविध संघटनांचे पदाधिकारी, विविध पक्षाचे नेते शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. परंतु मराठा समाज तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या पार्श्वभूमिवर स्नेह भोजनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती संयोजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी कळविले आहे.
खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी नाविन्यपूर्ण आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामुळे अनेक हितचिंतकांना खासदार पाटील यांच्या वाढदिवसाची उत्सुकता राहते. नांदेड दक्षिणचे आमदार असताना विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘मी अनवाणी’ हा अनोखा उपक्रम राबवविला होता. यात १४ हजार विद्यार्थ्यांना शूज आणि पायमोजे वाटप करण्यात आले होते.
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतुने ६ विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या निबंध स्पर्धेत ४९ हजार ७४९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धेतील निवडक ५० विजेत्या विद्यार्थ्यांना दिल्ली येथील देशाचे सर्वोच्च सदन संसद व राष्ट्रपती भवनचा ४ दिवसाचा अभ्यास दौरा काढण्यात आला होता.
या वर्षी देखील विद्यार्थ्यांकडून या स्पर्धेसाठी मागणी असून, दिल्लीतील देशपातळीवरील संस्था बघण्याची शालेय विद्यार्थ्यांची मागणी आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने कुणीही हार तुरु आणू नये आणि वाढदिवसानिमित्त संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहान खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.