हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत धुरकरांनी उडविला शंकरपटाचा धुराळा; महिला धुरकऱ्यांचं कौतुक व बक्षिसांचा वर्षाव

हिमायतनगर, अनिल मादसवार| मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक राज्यासह दूरदूरवर प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वराच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्ताने तब्बल ११ वर्षानंतर शंकरपट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता शंकरपट स्पर्धेचं फायनल झालं यात विजेत्या बैलजोडीच्या मालकांना श्री परमेश्वर मंदिराच्या सभागृहात विजेत्यांना 51 हजारांपासून ते 2 हजार 100 रुपये पर्यंत असे विविध बक्षीस, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच पुढील वर्षी याही पेक्षा उत्साहात शंकरपट स्पर्धेचे आयोजन आणि बक्षिसाच्या वाढ करण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले.
शंकरपट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पट सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांची क्षणोक्षणी उत्कंठा शिगेला पोहोचत होती. प्रेक्षकांच्या नजरा क्षणभरही हलत नव्हत्या. कोण बाजी मारेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यासारखं प्रत्येक बैलजोडीने सर्वांनाच गोठवून ठेवलं. क्षणोक्षणी रंगत वाढतच राहिली. सामन्यांचं अस्सल मायबोलीत धावतं वर्णन रोमांचित करणारं होतं. एका विलक्षण थराराचा अनुभव देणारा शंकरपट जत्रा मैदानावर धुरळा उडवीत होता. पहिल्याच दिवशी 30 जोड्यांनी रसिकांची मने जिंकली. शंकरपटाचा हा थरार पाहण्यासाठी केवळहिमायतनगर नव्हे तर पंचक्रोशीतील आणि आजूबाजूच्या तालुक्यातील व जिल्ह्यातील आणि लागूनच असलेल्या तेलंगणा राज्यातील अनेक रसिकांनी हजेरी लावली. प्रेक्षकांनी दमदार जोड्यांना मनापासून दाद दिली. सोमवार दिनांक १८ मार्च रोजी या शंकरपटाचे आमदार जवळगावकर याच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. पहिल्या दिवशी स्पर्धेत 30 ते 40 बैलजोड्यानी सहभाग घेतला होता.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्याच्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी मंगळवारी शंकरपट शर्यतीचे फायनल परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या स्पर्धेत सकाळी 12 वाजल्यापासून सुरुवात झाली, यावेळी पटाच्या जोडीचं चित्तथरारक दृश्य उपस्थित प्रेक्षकांना खिळून ठेवून होते. यावेळी महिला धुरकरी सीमाताई पाटील यांनीबैलगाडा शर्यतीत चित्तथरारक प्रदर्शन करून उपस्थित शेतकरी प्रेक्षकांची वाहवाह मिळविली. या स्पर्धेत जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, पुसद, मध्यप्रदेश, तेलंगाणा, विदर्भ, कर्नाटक राज्यातून शेकडो बैलजोड्या या शंकरपट स्पर्धेसाठी दाखल झाल्या होत्या.
या स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या असून, अ गटातील स्पर्धकांमधून 95 मीटर अंतर पार करून बाजी लावणाऱ्या लक्ष्या राणा या बैलजोडीच्या साथीने साहेबराव पाटील यांच्या जोडीने 6.33 सेकंदांत अंतर कापून प्रथम क्रमांकाचे 51 हजाराचे बक्षीस पटकावल, तर राजू पाटील शेवाळे यांच्या बिच्छू अर्जुन या जोडीने 6.49 सेकंदात अंतर पार करून दुसरा क्रमांकाचे 31 हजाराचे बक्षीस मिळविल. श्री सोपी देवस्थानच्या माळी आणि देवा या बैल जोडीने 6.55 सेकंदात अंतर कापून तिसऱ्या क्रमांकाचे 21 हजाराचे बक्षीस मिळविल, चौथ्या क्रमांकाचे मानकरीचे चिंतामणी शिरसाठ यांची बैलजोडी विराट आणि राणा याने 6.58 सेकंदात अंतर कापून चौथा क्रमांक मिळविला तसेच श्री विराज सुनील मोरे यांच्या पिस्तूल आणि विठ्ठल या बैल जोडीने 6.80 सेकंदामध्ये अंतर कापून पाचवा क्रमांक मिळविला श्री नितीन वानखेडे यांच्या मोती आणि लाडक्या या बैल जोडीने 6.80 सेकंदात अंतर पार करून सहावा क्रमांक मिळविला श्री आसिफ खाजा जुम्मा खाजा यांच्या गोळ्या आणि फरायल या बैल जोडीने 6.80 सेकंदात अंतर कापून सातवा क्रमांक मिळविला तर आठव्या क्रमांकाचे मानकरी ज्ञानेश्वर शिजू पवार यांची निळू व वादळ ही बैल जोडी ठरली असून या बैल जोडी 6.83 सेकंदात शंकर पटाचे अंतर कापले, नव्या बक्षिसाचे मानकरी स्वर्गीय रमण कारभारी यांच्या शंभू व कुत्ता रॉकेट या बैल जोडीने मिळविला असून याने 6.83 सेकंदात अंतर कापले आहे तर दहाव्या क्रमांकात श्री प्रभाकर देवराव घुगे यांची माऊली आणि तुफान ही बैलजोडी ठरली असून या बैल जोडीने 6.86 सेकंदात अंतर पार केले आहे तर अकराव्या क्रमांकाचे मानकरी ताज खा जहागीर खान यांची बैल जोडी ठरली असून आझाद आणि तेजा या जोडीने 6.87 सेकंदात अंतर कापून शंकर पटाचे बक्षीस पटकावले आहे.
महाशिवरात्री यात्रेतील शंकर पटाच्या ब गटामध्ये एकूण पंधरा बक्षीस ठेवण्यात आली होती यामध्ये प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचे मानकरी ताज खा जहागीर खान यांचे सिकंदर आणि जलवा या बैल जोडीने पटकावला असून 6.52 सेकंदात 95 मीटरचे अंतर कापून हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेतील शंकर पटाचे मानकरी ठरून पाहिले 21 हजाराचे बक्षीस जिंकलं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर कुमारी भारती संतोष कोरडे यांची सेवा आणि भवऱ्या या बैल जोडीने 6.61 सेकंदात अंतर कापुन 10 हजार 555 रुपयांचे बक्षीस जिंकलं, तिसऱ्या क्रमांकावर साहेबराव पाटील यांची सरकार आणि देवा ही बैल जोडी ठरली असून, या बैलजोडीने 6.67 सेकंदात अंतर पार करून 9999 रुपयांचे बक्षिस जिंकले आहे, श्री गजानन विठ्ठलराव बाबळे यांचे देवा अर्जुन ही बैल जोडी 6.70 सेकंदात अंतर कापून चौथ्या क्रमांकावर पोचली, पाचव्या क्रमांकावर अमोल आनंदराव जोगदंड यांची गांगुली आणि पट्ट्या ही बैल जोडी गेली असून या बैल जोडीने 6.71 सेकंदाचे अंतर कापले आहे. सहावा क्रमांक माधवराव कराळे यांचा गरुडा आणि शिवा ही जोडी ठरली असून 6.74 सेकंदात अंतर कापले आहे, असिफ खा जुंमाँ खा यांच्या नंद्या पाचर या जोडीने 6.87 सेकंदात अंतर पार केले आहे, आठवा क्रमांक सोमा सैदल यांची कन्हैया गरुड ही जोडी ठरली असून या जोडीने 6.93 सेकंदात अंतर पार केले आहे.
नववा क्रमांक कैलास ठाकूर यांच्या गज्या खंड्या ही बैलजोडी ठरली असून 6.96 सेकंदात अंतर पार केले आहे, दहावा क्रमांक स्वर्गीय रमण कारभारी यांची शंभू आणि बन्सी ही बैलजोडी ठरली असून 7.5 सेकंदात पटाचे अंतर कापले आहे, अकराव्या क्रमांकावर किरण फौजी यांची गोट्या चिमटा ही जोडी ठरली असून 7.12 सेकंदात अंतर पार केले आहे, बारावा क्रमांक युवराज चव्हाण यांची रॉकी आणि चिंट्या ही जोडी ठरली असून 7.17 सेकंदात अंतर पार केले आहे, तेरावा क्रमांक रणवीर आडे यांच्या बलविर आणि बालवीर या जोडीला मिळाला असून 7.18 सेकंदात या जोडीने पटाचे अंतर कापले आहे, चौदावा क्रमांक संतोष काळे यांच्या तेजा-लकी या जोडीला मिळाला असून 7.20 सेकंदाचे अंतर कापले आहे . पंधरावा क्रमांक संजय बन्सीलाल राठोड यांच्या डॉलर आणि चेतक या बैल जोडीने मिळविला असून 7.24 सेकंदात पटाचे 95 मीटर अंतर कापून बक्षीसाचे मानकरी ठरले आहे.
तसेच या शंकरपाटाच्या स्पर्धेमध्ये महिला धुरकरी सीमाताई पाटील गंगापूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील महिलेने सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून, यांनी हाकलेल्या बैलगाडीला विविध प्रकारचे बक्षसे मिळाली आहे. शंकरपटात घड्याळ मास्टर संदीप भाऊ कुंडकर, श्याम भाऊ राठोड, रामचंद्र कुंडकर यांनी काम पाहिले असून, यंदाचे हे शंकरपट स्पर्धा न भूतो न भविष्यती अशी ठरली असल्याचे प्रतिक्रिया शंकरपट शौकीनांकडून ऐकावयास मिळाली आहे. यंदाच्या या शंकरपटानंतर पुढच्या वर्षी याहीपेक्षा भारदस्त पद्धतीने ही स्पर्धा घेतल्या जाईल आणि बक्षीसात वाढ केल्या जाईल असे आश्वासन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी बक्षीस वितरण प्रसंगी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शंकरपट समितीचे अध्यक्ष संतोष गाजेवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सचिव श्याम पाटील, कोषाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण यांच्यासह समितीचे सर्व सदस्य, मंदिर कमिटीचे सर्व संचालक, पत्रकार, पोलीस, व पंचक्रोशीतील शेतकरी व शंकरपट शौकीन उपस्थित होते.
