नांदूसा येथे सर्व घरांना नळ जोडणी गाव झाले टँकरमुक्त
नांदेड| नांदेड तालुक्यातल्या नांदुसा या गावात दरवर्षी एप्रिल ते जून या काळात पाण्याची टंचाई भासत होती. आता जल जीवन मिशन योजनेमुळे नांदुसा गाव टँकरमुक्त झाले असून, प्रत्येक कुटुंबास नळ जोडणीव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.
नांदूसा या गावामध्ये 272 कुटुंब राहतात. या गावात दरवर्षी एप्रिल ते जून या काळात पाण्याची टंचाई निर्माण होऊन गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात होता. आता जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत या गावात एक कोटी 24 लाख 69 हजार इतक्या किमतीचे पाणी पुरवठा योजनेची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता गावाला नळ जोडणीव्दारे मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जात आहे.
यापूर्वी गावात नऊ हातपंप व एक विद्युत मोटरव्दारे पाणीपुरवठा केला जात होता. एप्रिल ते जून या काळात टंचाई भासात असल्यामुळे टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जायचा. आता जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे कामे पूर्ण झालेली आहेत. आसना नदी काठावर एक उद्भभव विहीर घेण्यात आली आहे. सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन करून गावात 85 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधून गावातील वितरण व्यवस्था सुमारे साडेचार किमी इतकी पूर्ण करून गावातील 272 कुटुंबांना नळ कनेक्शन देऊन नळाव्दारे पाणी पुरवठा चालू करण्यात करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गावातील प्रत्येक घरात नळ जोडणी उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने जल जीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत या गावांमध्ये फेब्रुवारी 2023 पासून सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे आता टँकर पासून गावाला मुक्ती मिळाल्याचे सरपंच पूजा तुकाराम जनकवाडे यांनी सांगितले आहे.
दरम्यान नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी नांदूसा येथे भेट देऊन पाणी पुरवठा योजनेची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी सरपंच पूजा जनकवाडे यांनी जल जीवन मिशनमुळे गावात पाणी मिळून गाव टँकरमुक्त झाल्याबद्दल शासनाचे आभार मानले आहेत.
जल जीवन मिशनमुळे गाव टँकर मुक्त झाले आहे. विशेषत: जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुरळीत पाणीपुरवठा होत असल्यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे उतरले. -पूजा तुकाराम जनकवाडे, सरपंच, नांदूसा