हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी, कोठा, विरसनी, दिघी, खडकी, सरसम, पोटा शिवारात गौण खनिज काळी रेती व मुरुमाची विनापरवाना चोरी करून अव्वाच्या सव्वा दराने विक्री करण्याचा गोरक्षाधंदा जोमात सुरु झाला आहे. दिवाळीच्या सुरुवातीपासून शासनाचा महसूल बुडवीत होत असलेल्या या अवैद्य धंद्याकडे महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष व स्वार्थीवृत्ती कारणीभूत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरीकातून केला जात आहे. हा प्रकार मागील महिन्यात हिमायतनगर पोलिसांनी एका वाहनाला रंगेहात पकडून केलेल्या कार्यवाहीनांतर उघड झाला आहे. एककीकडे महसुलाचे अधिकारी कर्मचारी रेती तस्करांना अभय देत असताना पोलिसांनी कार्यवाहीचा बडगा उगारला असला तरी अजूनही राष्ट्रांदिवस या धंदा राजसरोसपण चालवीत शेणाच्या गौण खनिज नियमाला तिलांजली देणारा ठरत आहे. परिणामी संबंधित सज्जाचे तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार यांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गौण खनिज चोरीच्या या प्रकारावर अंकुश लावण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लक्ष केंद्रित करून गरिबांची होणारी लुबाडणूक थांबवावी. आणि शासनाचा अल्प दरातील रेती डेपो हिमायतनगर तालुक्यात सुरु करून स्थानाचा बुडणार महसूल वाढवावा अशी मागणी केली जात आहे.
हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शासकीय निमशासकीय आणि खाजगी व घरकुलाचे बांधकामे सुरु आहेत. यासाठी रेती व मुरूमाची आवश्यकता असल्याने नदी, नाल्याच्या काठावर असलेल्या रेती घाटावरून महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काही राजकीय वरदहस्त असलेल्या ट्रैक्टर चालक, मालक यांनी रेती विक्रीचा गोरखधंदा जोमात सुरु केला आहे. एव्हडेच नाहीतर नदीकाठच्या काही गावात मोठ्या प्रमाणात रेतीची साठेबाजी करून गरजूना अव्वाच्या सव्वा दराने रेती विक्री करून शासनाचा महसूल बुडवीत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक शासनाच्या रेटीडेपोच्या दुर्लक्षित धोरणामुळे नाईलाजास्तव काळ्याबाजारातून रेती खरेदी करून घरकुलाचे काम करावे लागत आहेत. यामुळे सर्वात जास्तीचा पैसा केवळ रेतीवर होत असल्याने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात बहुतांश घरकुलाचे कामे अर्धवट स्थितीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.
सध्या तालुक्यात पाऊस थांबल्याने नदीपात्राची पाणी पातळी कमी झाल्यामुळे रेती वर आली आहे. या संधीचा फायदा घेऊन रेती तस्कर महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून रेतीची चोरी करून गरजूना आवाच्या सव्वा दराने विकून मालामाल होण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन वर्षापासून हिमायतनगर तालुक्यातील एका रेती घाटात लिलाव झाला नाही. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात राजकीय वरदहस्त असलेल्या काही ट्रॅक्टर चालक मालकांनी रेतीचा गोरख धंदा चालविला आहे. या धंद्याकडे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लक्ष देऊन हिमायतनगर तालुका सुरू असलेल्या रेती चोरीच्या प्रकाराला अंकुश लावावा. आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे करून ठेवले त्या ठिकाणी धाडी मारून शासनाच्या महसुलात वाढ करावी. तसेच जप्त केलेल्या रेतीतून आणि साठेबाजीतून शासनाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार अल्प दरातील रेती डेपो विक्रीचे स्टोल सुरु करून घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या गोरगरिबांना अल्प दरात रेती उपलब्ध करून देऊन न्याय द्यावा अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांतुन केली जात आहे.
मागील महिन्यात म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी गौण खनिजाची चोरी करून काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने नेत असताना हिमायतनगरचे पोलीस कर्मचारी श्यामसुंदर गंगाधरराव नागरगोजे यांनी शेख निसार शेख बाबू रा. सरसम आबादी हिमायतनगर यास राष्ट्रीय महामार्गावरून विनापरवाना रेतीची वाहतूक करताना रंगेहात पकडले. आणि त्याच्यावर कलम 379 भादवी व कलम 4, 21 गौण खनिज अधिनियम प्रमाणे कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर देखील हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात रेतीचा गोरखधंदा राजरोसपणे सुरूच आहे.