मराठा समाजाच्या सर्वेक्षणात हलगर्जी केल्यास होणार नियमानुसार कार्यवाही
नांदेड| राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण युद्धपातळीवर व विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या कामासाठी आयोगाला आवश्यक शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य तसेच अन्य संस्थामधील आवश्यक सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहीत करण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे. असे असताना काही विभाग प्रमुख सर्वेक्षणासाठी अधिकारी, कर्मचारी यांचा अचूक तपशील नोडल अधिकारी यांना सादर करीत नसल्याचे निर्देशनास आले आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाने करावयाच्या सर्वेक्षणासाठी निकष निश्चित केले आहेत. त्याबाबतची प्रश्नावली अंतिम केली आहे. राज्य मागासवर्ग आयोगास मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी करण्यात येणार सर्वेक्षणाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावयाचे सक्त निर्देश आहेत. या सर्वेक्षणाच्या कालावधीत जिल्ह्यातील कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांना रजा अनुज्ञेय करता येणार नाहीत तसेच मुख्यालय सोडता येणार नाही.
जिल्हा/उपविभाग/तालुका/नगर-परिषद/पंचायत स्तरावरील सर्व विभागप्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी परस्परांचे समन्वयात राहून आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे अधिकारी, कर्मचारी, वाहन व्यवस्था, आवश्यक साधन सामग्री, माहिती इत्यादींची उपलब्धता हयगय न करता नोडल अधिकारी यांना तात्काळ करुन द्यावी. याकामी विलंब अथवा हलगर्जी केल्यास संबंधीताविरुध्द नियमानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.
शासकीय योजनांवर आधारित कार्यक्रमाचे आकाशवाणी केंद्राद्वारे दररोज प्रसारण
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन शासनाच्या विविध योजनांवर आधारित कार्यक्रम 5 जानेवारी 2024 पासून दररोज सकाळी 8.15 वाजता आणि रात्री 8 वा. प्रसारित करण्यात येत आहे. शासनाच्या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी तसेच योजनाची माहिती नागरिकांना होवून त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेता यावा यासाठी 15 मिनीटाचे हे कार्यक्रम प्रसारित होत आहे.
श्रोत्यांना हे कार्यक्रम एफएम बँड 101.1 मेगाहर्टसवर आणि न्युज ऑन एअर या मोबाइल अप्लीकेशनवर ऑनलाईन ही ऐकता येतील. ‘पर्व विकासाचे जनसामान्यांच्या कल्याणाचे’ या सदरात विविध विभागप्रमुख शासकीय योजनांच्या माहितीसह याचा लाभ कसा घेता येईल याबाबत माहिती देत आहेत. विभाग प्रमुखांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाबाबत शंकाचे निरसण व समाधान या कार्यक्रमातून श्रोत्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमाचा सर्व नागरिक, श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारे व जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले आहे.