नांदेड। कर वसुलीसाठी पारंगत असलेली नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका पाणी प्रश्न हातळण्यात मात्र पूर्णतः अपयशी ठरली आहे.
ऐन कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी जीव लाहिलाही होत असताना संपूर्ण उत्तर नांदेड मतदार संघातील शहरवासीय नागरिक पाण्यासाठी परेशान आहेत. एवढेच नव्हेतर पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करीत आहेत.
विद्यमान लोकप्रतिनिधिंच्या अट्टाहासामुळे आणि नियोजनशून्य कारभारामुळे संपूर्ण नांदेड शहरास वेठीस धरण्यात येत आहे.शहरात टँकर द्वारे पाणी पुरवठा करून पर्यायी व्यवस्था करावी आणि पुढील दोन दिवसात नादुरुस्त पाईप लाईन दुरुस्त करून शहरातील पाणीपुरवठा पुर्ववत करावा व शहरवाशियांची तहान भागवावी.
अन्यथा दि.७ मे रोजी मनपा समोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा माकप जिल्हा सचिव मंडळ सदस्या कॉ.उज्वला पडलवार यांनी पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत दिला आहे. अशी माहिती माकप सचिव कॉ. गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.