अठरा वर्षाच्या आत मुलीचे लग्न झाले असल्यास तिला तिच्या बालविवाह रद्द करण्याचा अधिकार आहे – मा. मोनाली धुर्वे

हिमायतनगर| बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार 18 वर्षाच्या आत मुलीचे लग्न झाले असल्यास तिला तिचा बालविवाह रद्द करण्याचा अधिकार या कायद्याने दिला गेला आहे. तिच्यावरती बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, मुलीचे पालक, मित्रमंडळी यापैकी कोणीही झालेला बालविवाह रद्द करण्यासाठी मुलीच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करू शकतात. बालविवाह मुक्त झालेल्या मुलीसाठी भरण पोषण व निवाऱ्याची तरतूद या कायद्यात केली गेली आहे.
जन्मलेल्या बाळाच्या बाबतीत कायदेशीर कोठडीची तरतूद या कायद्याअंतर्गत केले गेले आहे. मुलींना वैद्यकीय मदत समुपदेशन तसेच पुनर्वसन या कायद्याअंतर्गत देण्यात यावे अशी तरतूद करण्यात आली आहे. बालविवाह झाल्या असल्यास कायद्यानुसार कारवाईची तरतूद केली आहे. यामध्ये लग्नासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांना एक लाख रुपये दंड व दोन वर्ष कारवासाच्या शिक्षेची तरतूद सुद्धा या कायद्याअंतर्गत केली गेली आहे. असे सविस्तर मत त्यांनी मांडून शिबिरार्थींना बालविवाहा विषयीचे समुपदेशन केले.
हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे मंगरूळ येथे आयोजित केलेल्या विशेष युवक शिबिराच्या सहाव्या दिवशी सकाळी दिनचर्या नंतर सकाळी दोन तास परिश्रम करण्यात आले. सकाळी 11 वाजता मौजे मंगरुळ येथे बालविवाह प्रतिबंधात्मक अभियान रॅली काढून गावकरी मंडळी चे जनजागरण केले. आणि गावाच्या दर्शनी स्थळी बालविवाहाच्या संबंधी अनेक स्लोगन युक्त पोस्टर चिपकवली. तसेच बौद्धिक सत्रामध्ये “बालविवाह रोखण्यात: युवकांची भूमिका” या विषयावर बोलताना त्यांनी वरील विचार व्यक्त व्यक्त केले. सदरील शिबिरातील कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व वीर हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मंचावरील मान्यवरांच्या स्वागतानंतर सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदरील शिबिराचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.शिवाजी भदरगे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिन्दी विभागाच्या प्रा. डॉ. शेख शहेनाज ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड येथून आलेल्या प्रकल्प समन्वयक, बालविवाह निर्मूलन प्रकल्प युनिसेफ नांदेड मा. मोनाली धुर्वे. यांनी बालविवाह प्रतिबंधासाठी युवकांची भूमिका या विषयावर आपले विचार मांडले. सदरील कार्यक्रमाचे आभार सहकार्यक्रमाधिकारी प्रा.डाॅ.एल.बी.डोंगरे यांनी मानले. या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व तसेच कार्यालयीन कर्मचारी बंधू भगिनी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
