हिमायतनगर। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तथा मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर (परीक्षा विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात दिनांक 23 मार्च 2024 शनिवार रोजी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला.
त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय प्राचार्या डॉ. उज्वला के. सदावर्ते लाभल्या होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. दिगंबर नेटके (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड) व प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव (संचालक, विद्यार्थी विकास मंडळ, रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड) लाभले होते. तसेच याव्यतिरिक्त व्यासपीठावर प्रा. डॉ. एल. बी. डोंगरे (सी.डी.सी. सदस्य) व प्रा. डॉ. गजानन दगडे (नॅक समन्वयक) हे उपस्थित होते.
परीक्षा विभाग प्रमुखाने विद्यापीठ ध्वज हातात घेऊन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून पथसंचलन केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली, त्यानंतर द्वीप प्रज्वलन व प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शेख शहेनाज अहेमद (परीक्षा विभाग प्रमुख) यांनी केले.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दिगंबर नेटके यांनी पदवीधारक विद्यार्थ्यांना आजचा पाल्य कसा असावा, आई-वडिलांविषयीची जबाबदारी, त्यांनी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवावी व समाजाचा घटक म्हणून सामाजिक जबाबदारी पार पाडावी असे प्रतिपादन त्यांनी केले तसेच प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी पदवीधारक विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन पदवीनंतरच्या संधी व आव्हाने यावर विवेचन करून पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमांमध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील कला शाखेचे 38 विद्यार्थी, विज्ञान शाखेचे 38 विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे 10 विद्यार्थी, एम.ए. दूरशिक्षण विभागाचे 09 विद्यार्थी असे एकूण 95 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
अध्यक्षीय समारोपामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी पदवीधारक विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शिक्षण विषयक, नोकरी विषयक व व्यावसाय विषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उत्तम असे सूत्रसंचालन प्रा. एम.पी. गुंडाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. संगपाल इंगळे (परीक्षा विभाग सहाय्यक) यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.