मराठा आरक्षण अध्यादेशानंतर हिमायतनगर फटाक्याची आतिषबाजी; ढोल तशात जल्लोष

हिमायतनगर,अनिल मादसवार| मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील मागण्या मान्य करत महाराष्ट्र सरकारने मराठा कुणबी नोंद असलेल्याच्या सग्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश जारी केला आहे. हे समजताच हिमायतनगर शहर परिसरातील मराठा समाज बांधवानी येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर फटाक्याची आतिषबाजी; ढोल तशात गजर आणि जिलेबी वाटून तोंड गोड करत आनंदोत्सव साजरा केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत हिमायतनगर शहर व परिसरातील मराठा समाजाच्या युवकांनी आपल्या अंगावर कैसेस दाखल करून घेत मराठा आरक्षणाचा मुद्दे लावून धरला होता. अनेक दिवस साखळी उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले होते. आज शासनाने मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याची दखल घेऊन सर्व मागण्या मान्य करत महाराष्ट्र सरकारने मराठा कुणबी नोंद असलेल्या सर्व नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्याचेही मान्य केला आहे.
हे समजताच हिमायतनगर शहरात सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने ज्यांच्यावर केसेस दाखल झाले त्या सर्वांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तोंड गोड करून एकमेकांना जिलेबी खाऊ घालून फटाक्याची आतिषबाजी करत ढोल ताश्याच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला आहे. तसेच मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा विजयाच्या घोषणा देत मनोज जरांगे पटेल तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…. एक मराठा लाख मराठा…. अश्या घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी करून ढोल ताश्याच्या गजरात हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिरासमोर जल्लोष साजरा केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आंदोलन अखेर शनिवारी संपुष्टात आले. राज्य सरकारने जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, तसा अध्यादेशही शुक्रवारी मध्यरात्री काढला आहे. या अध्यादेशात सरकार व जरांगेंमध्ये कळीचा मुद्दा ठरलेल्या सगेसोयऱ्याच्या मुद्याचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे जरांगे व मराठा समाजाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या अध्यादेशात सगेसोयरे शब्दाचा समावेश करण्यासाठी ठाम होते. त्यांनी सरकारकडे ही मागणी आग्रहीपणे लावून धरली होती. विशेषतः यासाठी आपले प्राणही पणाला लावले होते. त्यांची ही मागणी सरकारने मान्य करुन त्यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता केली आहे. सरकारच्या नव्या अध्यादेशात सगेसोयरेचा नेमका अर्थ काय हे बारकाईने स्पष्ट करण्यात आले.
सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल, असे राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.
तत्पूर्वी, मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळाने नवा अध्यादेश घेऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मंत्री दीपक केसरकर व मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते. यावेळी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे सरकारच्या शिष्टमंडळाने सांगितले. त्यानंतर मनोज जरांगेंनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. आम्ही आंदोलन मागे घेण्याचा निर्णय समाजाला विचारून घेतला आहे. मी मराठा समाजाला मायबाप मानले आहे. मी त्यांचा मुलगा म्हणून काम करतो, असे मनोज जरांगे यांनी या प्रकरणी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले. आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, असेही मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आता आम्ही नवी मुंबईतूनच गुलाल उधळत आपापल्या घरी परतणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
