नांदेड| तलाठी पदाचा गैरवापर करून जाणीवपूर्वक चुकीचा फेरफार करून माझ्या कपाळावरचं कुंकू पुसून माझे लहान लहान लेकरे पोरके करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरच्या कर्तुत्ववान, तलाठ्याचा बैंड लाऊन भव्य सत्कार करण्यात येणार आहे. अशी आगळी वेगळी पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर विविध वर्तमान पत्रात आणि सामाजिक संकेत स्थळ, टीव्ही चॅनेलवर बातमी प्रकाशित होताच हिमायतनगर येथील सज्जाचे तलाठी दत्तात्रय शाहुराव पुणेकर यांची तडकाफडकी उचलबांगडी भोकर तालुक्यातील देवठाणा येथे करून शिस्तभंग केल्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तसे आदेश पत्र क्रमांक २०२३/मशाका-१/आस्था-३/वि.चौ./प्र.क्र.-०८ जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड दिनांक २८/१२/२०२३ रोजी जारी करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मागील वर्षी २८ नोहेंबर रोजी हिमायतनगर येथील युवा शेतकरी परमेश्वर जाधव यांनी हिमायतनगरचे तलाठी दत्तात्रय शाहूराव पुणेकर यांनी चुकीचा फेरफार केल्यामुळे, मंडळ अधिकारी दिलीप परसराम राठोड यांनी तो मंजूर केल्यामुळे जमीन बळकाऊ पाहणाऱ्या व्यक्तीच्या धमक्यांना घाबरून १० जून २०२३ रोजी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली होती. या घटनेनंतर मयताच्या पत्नीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले, तसेच नांदेड, हदगाव येथे अनेक चकरा मारल्यानंतर अखेर तलाठ्याने केलेला चुकीचा बेकायदेशीर रित्या नोंदविलेल्या फेरफार उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी 28 नोव्हेंबर रोजी रद्द केला. परंतु चुकीचा फेरफार करणाऱ्या तलाठ्यावर व मंडळ अधिकारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता एक प्रकारे अभय दिले असल्याचा आरोप तक्रारकर्त्यानी केला आहे. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच तडकाफडकी उचल बांगडी केली आहे. परंतु पंधरा दिवसांपूर्वी तक्रार दिली असताना अद्यापपपर्यंत कार्यवाही का..? करण्यात आली नव्हती असं प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. त्या तलाठ्यांनी हिमायतनगर येथे कार्यरत असताना आत्तापर्यंत किती जमिनीचे फेरफार अश्या पद्धतीने केले किंवा सातबाराच्या लावले याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. कारण हे प्रकरण समोर आल्यानंतर नेकजण तलाठ्यांनी माझ्याकडून चार आकडी रक्कम घेतली, माझ्याकडून पाच आकडी रक्कम घेतली वडिलोपार्जित जमीन नावाने करायची असली तरी देवाणघेवाण केल्याशिवाय कामच केलं नाही अश्या तक्रारी खाजगीत केल्या जात आहेत. एव्हडेच नाहीतर गौण खनिज मुरूम, रेती चोरांना देखील यांच्यामुळे अभय मिळाले असल्याने हिमायतनगर येथे अद्याप शासनाचा स्वस्त दरातील रेती डेपो सुरु झाला नाही, असेही नागरिक बोलून दाखवीत आहेत. त्यामुळे हिमायतनगर येथून बदली करण्यात आलेल्या त्या तलाठ्याच्या कार्यकाळातील कामकाजाची आणि मालमत्तेची चौकशी होणे अपेक्षित आहे.
याबाबत मयत शेतकऱ्याचे बंधू विशाल याणी सांगितले कि, माझ्या मागणीनुसार त्यांना कायम बडतर्फ करायाला हवे होते. मात्र पुन्हा केवळ बदली करून चुकीचे काम करणाऱ्या तलाठ्याला पाठीशी घालून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना माणसाच्या जीवाचे काहीही घेणं देणं नाही यांना फक्त अधिकारी यांच्यावर काहीही होता कामा नये हि भूमिका प्रशासनाकडून घेतली जात आहे. हिमायतनगर तालुक्यात स्वार्थापोटी त्यांनी माझ्यासारखी अशी खूप कामे केलीत आहे, त्यामुळे इतर बदलीच्या ठिकाणी गेल्यानंतर हा तलाठी चुकीचे काम करणार नाही याची काय गॅरंटी..? असा सवाल उपस्थित करून जाधव यांनी आज पुन्हा नांदेड दौऱ्यावर येणारे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन मागणी करणार आहे. आणि तलाठयाच्या सत्काराची काढलेल्या पत्रिकेनुसार मी व आमचे कुटुंब त्यांचा भर चौकात बैंड लावून स्वागत करण्याच्या गोष्टीवर ठाम असल्याचे विशाल जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना म्हंटले आहे.
हिमायतनगर येथील सज्जाचे तलाठी दत्तात्रय शाहुराव पुणेकर, यांनी पदाचा गैरवापर करून मौजे हिमायतनगर येथील शेत सर्वे नं. ४१७/२ व ४१७/३ मधील बेकायदेशिर रीत्या घेतलेले फेर क्र. ७८३७,७८३८ व ७८३९ हे रद्द करणेबाबत व संबंधितांवर शासकीय सेवेतून बडतर्फ करून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करणे बाबत तक्रार केली आहे. त्यानुषंगाने तलाठी साझा हिमायतनगर श्री शाहुराव पुणेकर यांचे खुलाशातील नमुद मुद्दे व तहसिलदार हिमायतनगर यांनी अहवालीत केले प्रमाणे संबंधीत तलाठी यांचा खुलासा असमाधानकारक असल्याचे नमुद करून संबंधीत तलाठी यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावीत करण्याबाबत उपविभागीय अधिकारी हदगांव यांनी संदर्भीय क्र. १ अन्वये शिफारस केली आहे.
उपरोक्त परिस्थितीत उपविभागीय अधिकारी हदगांव यांचे अहवालाचे अवलोकन केले असता श्री दत्तात्रय शाहुराव पुणेकर, तलाठी यांचे विरुध्द शिस्त भंगविषयक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सबब, त्यांना सदर पदावर ठेवणे योग्य होणार नाही. त्यानुषंगाने शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील कलम ४(४) दोन नुसार मा.विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचे कार्योत्तर मान्यतेस अधिन राहून श्री दत्तात्रय शाहुराव पुणेकर, तलाठी यांच्या पदस्थापनेत पुढीलप्रमाणे अंशतः बदल करण्यात येत आहे. तसे पत्र क्रमांक १) उपविभागीय अधिकारी हदगांव यांचे पत्र क्र २०२३/आस्थापना /वि. चौ/कावि दि.२६.१२.२०२३ २) महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र तलाठी-२०२३/प्र.क्र.०८/ई-१० दिनांक १८/०९/२०२३ पाठविण्यात आले आहे.
बदली आदेश पत्रामध्ये तलाठी श्री दत्तात्रय शाहुराव पुणेकर, तलाठी सध्या पदस्थानेचे ठिकाण तलाठी साझा, हिमायतनगर ता. हिमायतनगर येथुन आता त्यांनी बदली करून पदस्थापनेचे ठिकाण तलाठी साज्जा, देवठाणा ता. भोकर जी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. तसे आदेश तहसिलदार हिमायतनगर यांना देण्यात आलें असून, त्यांनी श्री दत्तात्रय शाहुराज पुणेकर, तलाठी साझा, हिमायतनगर ता. हिमायतनगर यांच्याकडील सद्य पदाचा पदभार इतर तलाठी यांचेकडे हस्तांतर करुन त्यांना बदलीने पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करावे.आणि तहसिलदार भोकर यांना तसे आदेशीत करण्यात आले असून, त्यांनी श्री दत्तात्रय शाहुराज पुणेकर, तलाठी सज्जा, हिमायतनगर ता. हिमायतनगर यांना बदलीधीन पदावर रुजू करुन घेऊन अनुपालन अहवाल सादर करावा. सदर आदेशाची अमंलबजावणी तात्काळ करण्यात यावि. त्या आदेश पत्रावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, भा.प्र.से. नांदेड यांची स्वाक्षरी आहे. तसेच प्रतिलिपी म्हणून बदली मान्यतेसाठी मा. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर, यांना देवून सदर बदलीस कार्योत्तर मान्यता देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच प्रतिलिपी म्हणून उपविभागीय अधिकारी हदगांव/भोकर, तहसिलदार हिमायतनगर/भोकर, श्री दत्तात्रय शाहुराय पुणेकर, तलाठी हिमायतनगर ता. हिमायतनगर यांना अनुपालनास्तव पाठविण्यात आले आहे. यावर निवासी जिल्हाधिकारी महेश वदडकर यांची स्वाक्षरी आहे.