आमचीबी दीवाळी!
बहुदा एकोणीशे सत्याऐंशी- अठ्ठ्याऐंशीचा काळ असावा. दुष्काळाच्या सात- आठ वर्षानंतरचा काळ… मंतरलेले दिवस… पाहुणचाराने भारावलेले दिवस अतिशय माणूसकीचा आणि रितरीवाजाचा सुवर्ण मध्य काळ… मनाच्या श्रीमंतीचा लक्षवेधी वाढलेला स्तंभालेख! शिलालेखाप्रमाणे मनाच्या गाभार्यात कोरलेले दिवस म्हणजे आमचे बालपण… बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात त्याची अनुभूती याची देही याची डोळा अनुभवलेे आमच्यासारखे आम्हीच! दिवाळीला सुट्या लागल्या की बालमित्र आपापल्या मामाच्या गावाकडे धूम ठोकायची आम्ही मात्र कपाळकरंटे… कारण आम्ही राहायलाच मामाच्या गावी. मामाकडेच बालपण गेलं. कारण तीन-चार वर्षाचा असताना आमच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला.
आमची आई ‘लालाई’ बाळांतपणातच जगाचा निरोप घेतल्याने आमचं बिर्हाड कायमचं मामाच्या घरी वसवलेलं… मग काय दिवाळी असो की दसरा, पोळा असो की पंचीम आजोळीच! मामा रागीट आणि कडक शिस्तीचे असल्या कारणाने म्हणावं तेवढं बालपण एन्जॉय करता नाही आले, तरीही मामाला चकवा देऊन बालपणीच्या मित्रांसोबत खेळण्याचा- बागडण्याचा आनंद लुटलो. मात्र दिवाळीला सर्वच बालमित्र मामाच्या गावी गेल्याने बालमित्रांचा विरह सहन होत नसत. त्यांच्याशिवाय दिवाळी साजरी करणे म्हणजे अभ्यासाशिवाय परीक्षा दिल्यासारखे होते. दिवाळी आणि फटाके हे ओघाने आलेच. फटाक्याशिवाय दीवाळी साजरी करणे म्हणजे अशक्यच! आजोळी किराणा दुकानामध्ये फटाके मिळायचे. सकाळी आणि संध्याकाळी फटाक्याचे दुकान बाजेवर अंथरण टाकून त्यावर फटाके ठेवायचे. त्यामध्ये सुतळीबॉम्ब, रॉकेट, टिकल्या, बंदुक, भिंगरी, तोट्यांची माळ, रंगीत आगडबी, फुलझडी, भुईचक्र आदी फटाके आमच्या आवडीचे पण घेऊन देणार कोण?
मामाची आर्थिक परिस्थिती बेताचीच! फटाके फोडायला आवडायचे मित्रमंडळींसोबत आनंदाच्या क्षणाचा आस्वाद घ्यायचा पण कसे? असा प्रश्न भेडसावत होता. एकदाचा दिवाळीचा दिवस उजाडला. सकाळी- सकाळी बाजेच्या चारपायावर एक-एक दिवा ठेवायचे तेही गव्हाच्या पिठापासून बनवलेले… उटणं अंगाला लावून बाजेवर बसायचो आंघोळीसाठी… आजीमाय अंगाला उटणं लावून अंग चोळून आंघोळ घालायची… दिवाळीचा फटाक्यांशी जसा संबंध येतो तसाच संबंध नव्या कपड्यांशी येतो. पण ते आमच्या काही भाग्यात नसे! जुनीच कपडे पितळेच्या तांब्यात कोळसे टाकून इस्त्री करायचो आणि तयार व्हायचो. मग गावात शिल्लक राहिलेल्या मित्रांसोबत गावभर लोकांनी फोडलेल्या फटाक्यात न फुटलेले फटाके शोधून आणायचो.
चार- दोन फटाके एखादा फुस्सं झालेला रॉकेट भेटला तर आभाळाएवढा आनंद व्हायचा. मग गावाच्या चावडीत आमचेबी फटाके म्हणत फोडायचो. काही फुटत काही नाही फुटत असा चार दिवसांचा दिनक्रम चालायचा. दिवाळीत गोडधोड पदार्थांची मेजवाणी असायची. मात्र आमचे आजोबा प्रतिष्ठीत व्यक्तींच्या घरी बटावदार असल्याने त्यांच्या घरुन आम्हाला गोडधोड पदार्थाचे पार्सल भेटायचे. आजी घरी पण बोटव्या (शेवया) दुध, गुळ मिसळून त्यावर ताव मारायचो. मग कंबरेला करदोडे बांधण्यासाठी हातात घेऊन ते करदोडे कंबरेला बांधून घ्यायचो आणि संध्याकाळी चार- दोन लोकांच्या घरी घराला आकाश कंदिल, स्टार आकाराचे लटकवलेले दिसायचे. चार दिवसाच्या दिवाळीत शेणाचा वाडा एक कला प्रकार असायचा. जनावराच्या म्हणजेच गायी- बैलाच्या शेणापासून अंगणात वाडा तयार करायचे. त्यात द्वारपाल, म्हशी, पाणी पित असलेल्या चारचौघी गायी, मुसळाने उखळात काही तरी कुटत असलेल्या उभ्या तरुण बाया दाखवायच्या.
लव्हाळ्यापासून दररोज एक दिवटी तयार करुन त्यात दिवा ठेवून घरातील सर्व मंडळी व गायी- म्हशींना ओवाळून ती दिवटी उकंड्यात लावायची. अख्या गावात सर्वत्र दिवट्यांची चकाकी पाहून मन हरवून जायचे. दिवाळीचे चार- पाच दिवस कधी संपायचे याचा पत्ता देखील लागायचा नाही. आजघडीला परिस्थिती बदलेली. मामाच्या गावी आता शहरी भागात रमलेले स्मार्ट जनरेशनचे भाचे गावाकडे व मामाकडे जायला तयार नाहीत. उटणं सोडून मोती साबण लावत आहेत. शेवया सोडून मॅगी संस्कृती निर्माण झाली आहे. नव्या कपड्यांची क्रेझ राहिलेली नाही. कारण वाढदिवस आला की प्रत्येक मंगलक्षणी नवी कपडे घेत आहेत. मोबाईलच्या नव्या मित्रामुळे गावाकडील मामाच्या मित्रांचा घोळका कधीच कोसो दूर गेला आहे. आता ना दिवटी ना दिपोत्सव थेट आता लाईटींग झाली घर भरुन… आता फटाक्यांपेक्षा पब्जी गेम खेळण्यात शहरी विद्यार्थी मश्गुल झाले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने गावाकडे जाणारी हौशी मंडळी मात्र आजही आठवणींना उजाळा देण्यासाठी पारावरच्या गप्पा करतात. पोरासवरांना शहाणपणाच्या गोष्टी सांगतात. दिवाळीची काल आणि आज जरी कुस बदललेली असली तरी मैत्रीचा गोडवा मात्र कायम जपला जातो.
याचे उदाहरण द्यायचेच म्हटले तर
दिन- दिन दिवाळी
गायी- म्हशी ओवाळी
गायी- म्हशी कोणाच्या?
गायी- म्हशी लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कोणाचा…
या ओळ्या मौखिक पद्धतीने आजही ग्रामीण भागात ग्लोबलायझेशनच्या दुनियेत ग्रामीण बाज आजही टिकून ठेवतात. यापेक्षा अजून काय हवे?
….मारोती भु. कदम, नांदेड. मो. ९०४९०२५३५१