शिवणी। किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ केंद्र अंतर्गत गोंडजेवली तांडा इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मेळावा दि.१५ जून रोजी घेण्यात आला. या वेळी सर्व पालकांनी उत्साहाने या मेळाव्यात सहभाग घेतला होता. प्रारंभी रंगरंगोटी व फुग्याने सजविलेल्या बैलगाडी तून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावातील सरपंच सुधाकर जाधव व शिक्षण प्रेमी व विद्यार्थ्यांचे आई वडील मोठया संख्येने उपस्थित होते.
विध्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी प्रवेशपात्र विध्यार्थ्यांचे औक्षण केले तदनंतर विध्यार्थ्यांचे नोंदणी करून शारीरिक विकास,बौद्धिक विकास,सामाजिक व भावनिक विकास,भाषिक विकास,गणनपूर्व तयारी व माता पालकांना मार्गदर्शन या सात कौशल्यांचा विकासाचा प्रत्यक्ष अनुभव विध्यार्थ्यांना देण्यात आला. तसेच प्रत्येक मुलांना गुलाब पुष्प, बलून, लाडू देऊन शाळेत पहिले पाऊल टाकलेल्या बालकांचे स्वागत करण्यात आले.
उपस्थित मान्यवर शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकां कडून विद्यार्थी व माता पालकांना प्रवेशोत्सवा बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी शाळापुर्व तयारी मेळावा क्रमांक २ अंतर्गत विविध स्टाॅल मांडण्यात आले होते. गावातून शिक्षक,पालक, शालेय व्यवस्थापन समिती, सर्व विद्यार्थी यांनी बैलगाडी तून प्रभातफेरी काढुन गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. सुंदर रांगोळी,आकर्षक सजावट,बलून सजावट, पुष्पगुच्छांचा सुगंध सर्व काही आनंददायी व प्रसन्न आणि उत्साही वातावरणात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत वेगळ्या पद्धतीने केले गेले.
पहिल्याच दिवशी शाळेची शंभर टक्के उपस्थिती होती. पहिल्याच दिवशी सर्व मुलांना पाठ्यपुस्तक व अंकलीपी तसेच नंतर बुंदी व खारीबुंदी शालेय पोषण आहार जेवण देण्यात आले.या प्रसंगी शिक्षकवृंद उत्तम बाबळे, बालाजी कांबळे, आचारे बस्वराज , बुरावाड राजेश तसेच ग्रामस्थ व मोठ्या संखेने पालक उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने,शिक्षणविस्तार अधिकारी संजय कराड, केंद्र प्रमुख कौड सत्यनारायण अप्पारावपेठ चे वरिष्ठ मुख्याध्यापक रत्नाळीकर प्रमोद यांनी शाळा पूर्वतयारी मेळाव्यात क्रं २ शुभेच्छा दिल्या.प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षक दिलीप वाघमारे यांनी परिश्रम घेतले.